लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ऑक्सिजनच्या टंचाईमुळे राज्यात भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे वाढते संकट आणि दुसरीकडे आरोग्य यंत्रणेवरील वाढत्या ताणामुळे व्यवस्थेपुढे आव्हान निर्माण झाले आहे. अशा स्थितीत राज्याच्या टास्क फोर्सने ऑक्सिजनच्या वापराविषयी राज्य सरकारला वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार, नियमित शस्त्रक्रिया रद्द करुन ऑक्सिजन वापरात सुसूत्रता आणण्यासाठी नियमावली सूचवली आहे.कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणावर उपयुक्त असल्याचे स्पष्ट झालेल्या; पण प्रतिमिनिट ८० लीटरपर्यंत ऑक्सिजन लागणाऱ्या 'एचएफएनओ'चा वापर बंद करून त्याऐवजी कमी ऑक्सिजनची गरज असणाऱ्या व सर्वसाधारणपणे तेवढ्याच प्रभावी ‘नॉन इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेशन’चा (एनआयव्ही) वापर करण्याची सूचना ठळकपणे देण्यात आली आहे. यामुळे ऑक्सिजनची लक्षणीय बचत होऊ शकते.
ऑक्सिजन प्रत्येक ठिकाणी वाचवा, रुग्णालयांतील ऑक्सिजन गळती थांबवा, गरज नसेल तर फ्लो मीटर बंद करा, समितीद्वारे वापरावर देखरेख ठेवा, तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया थांबवा आणि ऑक्सिजनवर आधारित उपचार पुढे ढकला, अशी सूचना केल्याची माहिती डॉ. राहुल पंडित यांनी दिली. टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांची त्वरित कठोर अंमलबजावणी केल्यास ऑक्सिजनच्या पुरवठ्याचे व्यवस्थापन करण्यात निश्चितच सुधारण झालेली दिसून येईल, असे मत टास्क फाेर्सने मांडले.
गृह विलगीकरणातील रुग्णाला रेमडेसिविर देऊ नका!nऑक्सिजन थेरपीद्वारे कोविड रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण हे ९८-१०० टक्के राखण्याऐवजी ९३ ते ९५ टक्क्यांपर्यंत राखण्याचे उद्दिष्ट ठेवा, ज्यामुळे रुग्णांच्या जिवाला धोका नसेल व ऑक्सिजनचीही बचत होईल. nत्याचप्रमाणे गरज असेल तरच पाच दिवसांनी सिटीस्कॅन करा आणि आरटी-पीसीआर न करता सिटीस्कॅन अहवालाच्या आधारे उपचार करू नका. nपहिल्या तीन ते पाच दिवसांत स्टेरॉईड वापरू नका व गृह विलगीकरणातील रुग्णांना रक्त पातळ होण्याचे किंवा रेमडेसिविर देऊ नका, अशाही सूचना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी दिल्या.