Join us

जागच्या जागी पुनर्वसन!

By admin | Published: January 02, 2015 10:43 PM

प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या हालचालींना वेग आला आहे.

पनवेल : प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या हालचालींना वेग आला आहे. वहाळ या ठिकाणीही बाधितांच्या पुनर्वसनाकरिता जागा संपादित करून त्या ठिकाणी भराव टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पुनर्वसनामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनाही साडेबावीस टक्के भूखंड देण्यात येणार आहेत. मात्र हे भूखंड पुष्पकनगर या ठिकाणी न देता ते उलवे नोडमध्ये मिळावेत, अशी मागणी वहाळकरांनी केली आहे, अन्यथा भरावाची कामे करू न देण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे.पनवेल परिसरातील १८ गावातील २०५४ हेक्टर क्षेत्रावर हा प्रस्तावित प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यापैकी १६१५ हेक्टर प्रत्यक्ष विमानतळाकरिता वापरण्यात येणार आहे. १५१४ आणि शासनाच्या मालकीची ४४३ हेक्टर पैकी १८८ हेक्टर क्षेत्र सिडकोकडे तीन वर्षांपूर्वीच वर्ग करण्यात आली आहे. आता विमानतळाकरिता ४५७ हेक्टर खाजगी जमीन संपादित करावी लागणार असल्याने वाघिवली, गणेशपुरी, कोंबडभुजे, तरघर, उलवे, वरचा ओवळा, वाघिवली पाडा, कोल्ही, कोपर आणि चिंचपाडा ही दहा गावे यात बाधित होणार आहेत. या ठिकाणी जवळपास ३ हजार ११३ कुटुंबे राहत असून १५ हजार इतकी लोकसंख्या आहे. वडघर व वहाळ या ठिकाणी बाधित होणाऱ्या घरांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यानुसार वडघर पॉकेट येथे ५० हेक्टर जमिनीवर भराव टाकला आहे. वहाळ या ठिकाणी पुनर्वसनाकरिता १०८ खातेदारांचे संमतीपत्र भरून घेण्यात आले आहे. सेक्टर २४, २५ आणि २५ ए अशा तीन सेक्टरमध्ये बाधितांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन आहे. सिडकोने पुनर्वसनाकरिता जे खातेदार बाधित झाले आहेत, त्यांनाही साडेबावीस टक्के क्षेत्र देण्याचे मान्य केले आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत १०८ शेतकऱ्यांना उलवे नोडमध्येच भूखंड देण्याची मागणी मान्य झाली होती, मात्र नुकत्याच झालेल्या सोडतीत काही शेतकऱ्यांची नावे पुष्पकनगरमध्ये आली आहेत. त्यामुळे वहाळ ग्रामस्थ संतप्त असून कोणत्याही परिस्थितीत पुष्पकनगरमध्ये भूखंड न घेण्याचा निर्धार केला आहे. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र पाटील आणि वहाळचे सरपंच रवी पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत सिडकोच्या धोरणावर ग्रामस्थांनी कडक ताशेरे ओढले. आमचे पुनर्वसन उलवे नोडमध्येच झाले पाहिजे, त्याच ठिकाणी भूखंड सिडकोने द्यावेत ही मागणी असल्याचे राजेंद्र पाटील यांनी सांगितले. याबाबत अंमलबजावणी झाली नाही तर वहाळमधील भरावाचे काम रोखले जातील, याची खबरदारी सिडकोने घ्यावी, असा इशारा पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे. (वार्ताहर)उलवे नोड पुष्पकनगरपेक्षा सरसविमानतळ बाधितांकरिता पुष्पकनगर विकसित करण्यात येणार आहे. सध्या या ठिकाणी भरावाचे काम सुरू असले तरी या परिसराचा विकास होण्यास वेळ लागणार आहे. आजचा विचार केल्यास उलवे नोड विकसित झाला असून त्याला मुंबईच्या कफ परेड परिसराचा लूक देण्याचे काम सुरू आहे. आजमितीला या नोडमधील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. पुष्पकनगर विकसित होईल तेव्हा त्या ठिकाणी आज फारसा फायदा नाही. त्यामुळे आम्हाला उलवे नोडमध्येच भूखंड हवे असल्याची प्रतिक्रिया वहाळ येथील खातेदारांनी दिली. च्ग्रामसभेने घेतलेल्या ठरावाची प्रत सिडको प्रशासनाला पाठविण्यात आली आहे. त्याचबरोबर सिडकोचे मुख्य अभियंता संजय चौधरी यांच्याशी संपर्क साधून पुनर्वसन बाधितांची भूमिका विशद करण्यात आली. यासंदर्भात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक बोलावून हा विषय निकाली काढण्यात येईल, अशी ग्वाहीही चौधरी यांनी दिली आहे.