मुंबई - गोरेगाव पूर्व द्रुतगती महामार्गालगत जवळपास 290 ते 300 रहिवासी घरे तसेच वाणिज्यिक गाळे असलेली वसाहत गेली 45 ते 50 वर्षीपासून अस्तित्वात आहे. पश्चिम दुर्तगती महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे प्रस्तावित रस्ता रुंदीकरणासाठी या ठिकाणी असलेली सदर वसाहत कायमस्वरूपी अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यासंदर्भात महापालिकेने येथील रहिवासी तसेच व्यावसायिकांना नोटिस दिली आहे. त्यामुळे रहिवासी तसेच व्यावसायिक गाळेधारक यांच्या मनात प्रचंड भिती व अस्वस्थता निर्माण झाली असून या संबंधी त्यांचे असलेले आक्षेप तसेच मागणी त्यांनी प्रभाग क्रमांक 52 च्या भाजपाच्या माजी नगरसेविका प्रिती सातम यांची भेटून घेवून त्यांना याप्रकरणी मदत करण्याची विनंती केली.
या आधी केलेले सर्वेक्षण तसेच या अगोदर दिलेले नंबर तसेच होणारे प्रस्तावित पुनर्वसन याबाबत कोणतीही माहिती न देता सरसकट नोटिसा देऊन 50 वर्षापासून या ठिकाणी राहणारे नागरिक तसेच याच परिसरात राहून व्यवसाय करून करणारे व्यावसायिक यांना विस्थापित करणे हे अन्यायकारक आहे अशी भावना रहिवाश्यांनी यावेळी व्यक्त केली.
याची गांभीर्याने दखल घेत रहिवाशांच्या प्रतिनिधी मंडळासोबत आपण पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त राजेश अक्रे यांची भेट घेऊन सर्व रहिवासी व व्यवसायिक यांचे पुनः सर्वेक्षण करून पुनर्वसन पश्चिम उपनगरातच करावे अशी विनंती केल्याची माहिती प्रिती सातम यांनी लोकमतला दिली.
तसेच या सर्व आक्षेपांचे निराकरण करण्यासाठी तसेच तातडीने या ठिकाणचे रहिवासी व व्यवसायिक व पालिकेच्या संबंधित अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलवावी तसेच सदर बैठक होईपर्यंत पुढील सर्व कार्यवाही तातडीने थांबवून रहिवाशांची असलेली भीती कमी करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती राजेश अक्रे यांना केल्याची माहिती त्यांनी दिली.