Join us

मालाडच्या जामऋषी नगर येथील झोडपट्टीला लागलेल्या आगीतील बाधितांचे पुनर्वसन करा; आमदार सुनील प्रभू यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: February 13, 2023 6:49 PM

मालाड पूर्व जामऋषी नगर येथील झोडपट्टीला लागलेल्या आगीत अंदाजे २०० झोपड्या जळून भस्मसात झाल्या. तर एका मुलाचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला.

मुंबई-मालाड पूर्व जामऋषी नगर येथील झोडपट्टीला लागलेल्या आगीत अंदाजे २०० झोपड्या जळून भस्मसात झाल्या. तर एका मुलाचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला.तर एकावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे या भीषण आगीतील बाधित कुटुंबांना खास बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत करावी. बाधित कुटुंबांचे तात्पुरते - कायमस्वरूपी स्थलांतर करावे अशी मागणी शिवसेना विधी मंडळ मुख्य प्रतोद,दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री उपनगर जिल्हाधिकारी यांच्याकडे ट्विट आणि एका पत्राद्वारे केली आहे.

तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन विभाग हद्दीत राहणाऱ्या पात्र कुटुंबांचे पुनर्वसन तत्काळ करण्यासाठी कालमर्यादित- नियोजनबद्ध पुनर्वसन योजना तत्काळ जाहीर करून पुनर्वसन करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

सदर ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहशीलदारांच्या देखरेखीखाली पंचनामे सुरू आहेत.याठिकाणी राहणारी कुटुंब ही अत्यंल्प उत्पादन गटातील असून मुख्यत्वे मजुरी व घरकाम करतात.सदर भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वनविभाग हद्दीत येत असून नैसर्गिक आपत्तीत शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईस पात्र नाही.त्यामुळे खास बाब म्हणून आपत्कालीन परिस्थिती म्हणून मुख्यमंत्री साहय्यता कक्षाद्वारे विशेष मदत जाहिर करून बाधीत कुटुंबाला वितरित करण्यात यावी.सदरहू ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाद्वारे बायामेट्रिक सर्वेक्षण करण्यात आले असून सदरहू जागेतील बाधीत कुटुंबाचे कायमस्वरूपी पुनर्वसन केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून नजीकच्या परिसरात तात्काळ  करावे अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे.

 तसेच सदर आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शासनाकडे सात हजार रुपये भरलेल्या शासनाच्या २०११च्या नियमानुसार पात्र कुटुंबाचे पुनर्वसन तात्काळ करण्यासंदर्भात काल मर्यादीत नियोजन पुनर्वसन योजना तात्काळ जाहिर करून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या जनतेचे पुनर्वसन करावे अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.

टॅग्स :मुंबई