सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई दिघा येथील रस्ता रुंदीकरणामुळे त्याठिकाणची काही दुकाने व घरे बाधित होणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी महापालिकेने रामनगर येथे नवीन वसाहत बांधलेली आहे. परंतु सर्व्हे होवूनही महासभेच्या निर्णयाअभावी बाधितांचे पुनर्वसन होवू शकलेले नाही.ठाण्यामधून नवी मुंबईत येणाऱ्या वाहनांना दिघा येथे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षांपासून रस्त्यालगत वसलेल्या लोकवस्तीमुळे त्याठिकाणचा रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे रहदारीच्या वेळी सुमारे ३०० ते ४०० मीटरच्या या अंतरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. ठाणे - बेलापूर मार्गावर शहराच्या प्रवेशद्वारावरच भेडसावणारी वाहतूक कोंडीची ही समस्या सोडवण्यासाठी त्याठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. त्याठिकाणी सध्या १५ मीटरचा रस्ता असून त्यात अधिक १५ मीटरची वाढ होणार आहे. रस्ता रुंदीकरणादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनेक दुकाने व घरांवर हातोडा पडणार आहे. त्यापैकी अनेकांचे गेल्या कित्येक वर्षांपासूनचे वास्तव्य असल्याने, अशांचा सर्व्हे करुन त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामध्ये सुमारे ४० ते ४५ दुकाने व घरे पात्र ठरण्याची शक्यता आहे. यांच्यासाठी काही अंतरावरच रामनगर येथे महापालिकेने वसाहत उभारली आहे. पुनर्वसनासाठी एमआयडीसीकडून महापालिकेला हस्तांतर झालेल्या या भूखंडावर रहिवासी इमारत व वाणिज्य गाळे यांची स्वतंत्र बांधणी केलेली आहे. मात्र बांधकाम पूर्ण होवून सुमारे दोन महिने होवूनही बाधितांचे त्याठिकाणी पुनर्वसन झालेले नसून रस्ता रुंदीकरणाचेही काम रखडलेले आहे.सदर भूखंडावर यापूर्वी रातोरात अनधिकृत झोपड्यांनी बस्तान मांडले होते. त्याची माहिती मिळताच विभाग कार्यालयातून सूत्रे हलल्याने त्यावर तत्काळ कारवाई झाली होती. दिघा येथील अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरु असताना त्याच काळात रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी दुकाने व घरांवर देखील कारवाई करण्याची सूचना पोलिसांनी मांडली होती. परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. सुमारे दोन महिन्यांपूर्वी वसाहतीचे बांधकाम पूर्ण झाले असून सद्यस्थितीला विद्युत विभागाचे थोडेफार काम शिल्लक आहे. परंतु पुनर्वसनासाठी झालेल्या सर्व्हेचा अहवाल अद्याप महासभेपुढे येवून त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न पडला असून त्याठिकाणची वाहतूक कोंडीची समस्याही कायम आहे.
पुनर्वसनाला मुहूर्त सापडेना
By admin | Published: March 09, 2016 3:50 AM