Join us

संजय गांधी उद्यानातील पात्र अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 5:35 AM

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पात्र अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन केले जाणार असल्याची घोषणा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पात्र अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन केले जाणार असल्याची घोषणा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हे पुनर्वसन मरोळ मरोशी येथे करण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात आयोजित बैठकीस मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे, आमदार विद्या चव्हाण, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मनीषा म्हैसकर, वन विभागाचे सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अस्तित्वात असलेल्या पात्र अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी जागेचा शोध पूर्ण झाला असून लवकरच तेथे त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, यासाठी म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन मंडळ एकत्र येऊन काम करणार आहे. पुनर्वसन होईपर्यंत उद्यानातील या नागरिकांसाठी वन विभागाने अस्तित्वात असलेल्या अत्यावश्यक मूलभूत सुविधांची दुरुस्ती करण्याची परवानगी द्यावी तसेच नवीन अत्यावश्यक मूलभूत सुविधांच्या उभारणीसंदर्भातील प्रस्ताव वनसंवर्धन कायद्यांतर्गत मंजुरीसाठी सादर करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.मालाड पूर्व येथील पोयसर नदी रुंदीकरणात (अप्पापाडा) बाधित झोपड्यांपैकी १२९ कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करण्यासंदभातील प्रस्ताव मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडे सादर करण्यात यावा, त्यावर योग्य निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.