Join us

'गिरगावकरांचे पुनर्वसन गिरगावातच'

By admin | Published: February 11, 2017 4:51 AM

शिवसेनेच्या भाषणात मराठी माणूस आहे, पण कर्तव्यात मराठी माणूस नाही. सेनेने मुळ गिरगावकर मुंबई बाहेर घालवला. आम्ही मात्र तसे होऊ देणार नाही

मुंबई : शिवसेनेच्या भाषणात मराठी माणूस आहे, पण कर्तव्यात मराठी माणूस नाही. सेनेने मुळ गिरगावकर मुंबई बाहेर घालवला. आम्ही मात्र तसे होऊ देणार नाही. मेट्रोमुळे बाधित गिरगावकरांचे गिरगावातच पुनर्वसन करु, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भाजपा उमेदवारांच्या प्रचारसभेत केली. गिरगाव येथील आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी गिरगावातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा सुरु झाल्याची आठवण सांगून या भूमीला वंदन करतो, अशी भावनिक साद घातली. शिवसेनेचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मी मेट्रो आणली ती विकासासाठी. मेट्रोमुळे बाधित होणा-या कुटुंबांना याच गिरगावमध्ये १२० फूटांऐवजी ५०० चौरसफुटाचे घर देऊ, असे ते म्हणाले. आम्ही मूळ गिरगावकरांना तुमच्या सारखे मुंबई बाहेर जावू देणार नाही. तुम्हाला मत मागायचा अधिकार नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.शिवसेनेच्या प्रचारावरही मुख्यमंत्र्यांनी टीका केली. ‘राम मंदिर आमच्या मनात आहे, ते आम्ही अयोध्येत बांधून दाखवू. राम मंदिर रेल्वे स्टेशन आणि पालिकेच्या निवडणुकीचा काय संबंध, असा सवालही त्यांनी केला. परवा ते म्हणाले, पाणी पीता ते आमचे आहे, उद्या टाटा पण म्हणतील मीठ माझे आहे. हा काय प्रकार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांची खिल्ली उडवली. सेना कित्येक वर्ष पालिकेच्या माध्यमातून फक्त मुंबईकरांची लूट करते आहे. आम्हाला मात्र महापालिकेत एक व्हिजन घेवून पुढे जायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. (प्रतिनिधी)