मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांसाठी उपनगरांमध्ये फेरीवाला क्षेत्रे घोषित करण्यात आली असली तरी तेथील स्थानिक त्याला विरोध करत हरकत घेत आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांची समस्या सुटणे बिकट झाले आहे. ही समस्या कायमस्वरूपी मिटावी म्हणून मुंबईतील रेल्वे स्थानके विकसित करण्यात यावीत आणि तिथे फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, असे साकडे भाजपाच्या मुंबई हॉकर्स युनिटने केंद्राला घातले आहे.भाजपाच्या मुंबई हॉकर्स युनिटचे अध्यक्ष बाबुभाई भवानजी यांनी यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेभ प्रभू यांना निवेदन सादर केले आहे. रेल्वेला आजघडीला विकासासाठी निधीची गरज आहे. ही गरज मुंबई आणि देशामधील रेल्वे स्थानकांचा विकास करून भागू शकते. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेमार्गावर एकूण १२८ रेल्वे स्थानके आहेत. सध्या त्यावर सिमेंटचे पत्रे लावून छत बनविण्यात आले आहे. त्याऐवजी प्लॅटफॉर्मची छते सिमेंट-काँक्रिटची केली आणि बहुमजली इमारत उभी केली तर अनेक समस्या सुटू शकतील. या इमारतींमध्ये फेरीवाल्यांना जागा दिली तर त्यांच्या जागेचे प्रश्नही सुटतील. शिवाय रेल्वेला उत्पन्न मिळेल. पदपथ आणि रस्त्यांवरील गर्दी कमी होईल. वाहतूक कोंडीही कमी होईल. महत्त्वाचे म्हणजे या इमारतींमधील जागा पार्किंगसाठी ठेवली तर तो प्रश्नही मार्गी लागेल, असे अनेक मुद्दे निवेदनात नमूद करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
रेल्वे स्थानकांमध्ये पुनर्वसन करा !
By admin | Published: August 24, 2015 1:02 AM