आंबेडकर नगरमधील रहिवाशांचे आठ दिवसांत पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:06 AM2021-07-26T04:06:46+5:302021-07-26T04:06:46+5:30
मुंबई : मालाड येथील कुरार व्हीलेजमधल्या आंबेडकर नगरमध्ये वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी येत्या आठ दिवसांत प्रयत्न करण्यात येतील, ...
मुंबई : मालाड येथील कुरार व्हीलेजमधल्या आंबेडकर नगरमध्ये वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी येत्या आठ दिवसांत प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन येथील लोकप्रतिनिधींनी संबंधितांना दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. याच काळात आंबेडकर नगर येथील पूरसदृश परिस्थिती दरम्यान किमान शंभर एक घरे पाण्याखाली होती. यावेळी येथील रहिवाशांनी प्रशासनाकडे मदतीसाठी हाक दिली. मात्र, त्यांच्या हाकेला कोणीच धावून आले नाही.
प्रत्येक पावसाळ्यात येथील नागरिकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. यावर आता सरतेशेवटी उपाय म्हणून येथील रहिवाशांचे कांदिवली अथवा लगतच्या परिसरात प्रकल्पग्रस्तांसाठीच्या ज्या इमारती बांधण्यात आल्या आहेत; त्या इमारतीमध्ये आंबेडकर नगरमध्ये सुमारे १३ हजार जणांचे पुनर्वसन करण्यात यावे, या मागणीसाठी स्थानिकांनी धरणे आंदोलन केले.
या आंदोलकांची भेट घेण्यासाठी आमदार सुनील प्रभू आणि राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण हे लोक प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि येत्या आठ दिवसांत येथील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासनदेखील या लोकप्रतिनिधींनी आंदोलकांना दिले.