सर्वसामान्य मुंबईकरांच्या छाताडावर बसून पुनर्वसन होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:06 AM2021-07-02T04:06:39+5:302021-07-02T04:06:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मालाड पूर्व कुरार मेट्रो स्टेशनच्या कामात बाधित होणाऱ्या येथील रहिवाशांचे मुंबई महानगरपालिका व एमएमआरडीएकडून ...

Rehabilitation will not be allowed under the umbrella of ordinary Mumbaikars | सर्वसामान्य मुंबईकरांच्या छाताडावर बसून पुनर्वसन होऊ देणार नाही

सर्वसामान्य मुंबईकरांच्या छाताडावर बसून पुनर्वसन होऊ देणार नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालाड पूर्व कुरार मेट्रो स्टेशनच्या कामात बाधित होणाऱ्या येथील रहिवाशांचे मुंबई महानगरपालिका व एमएमआरडीएकडून सर्व नियम धाब्यावर बसवून होऊ घातलेली कारवाई मुंबईचे प्रभारी व कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या आंदोलन करण्याच्या आक्रमक भूमिकेमुळे रद्द करण्यात आली आहे. सर्वसामान्य मुंबईकरांच्या छाताडावर बसून पुनर्वसन कदापि होऊ देणार नाही, गिरगाव पॅटर्नच्या आधारावर मालाड पूर्वमधील लोकांचेसुद्धा पुनर्वसन करावे, अशी आग्रही मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.

कुरार मेट्रो स्टेशनच्या कामात बाधित होणाऱ्या सुमारे १५० रहिवाशांना मुंबई महानगरपालिकेने घरे रिकामी करण्यासंदर्भात नोटीस दिल्या आहेत. मुळात कायद्यानुसार मसुदा परिशिष्ट-२ प्रथम प्रकाशित करावे लागते, त्यावर बाधित लोकांच्या सूचना-हरकती मागविल्यानंतर व त्यावर कारवाई करून अंतिम परिशिष्ट-२ तयार केले जाते व त्यातील पात्र लोकांना नियमानुसार सदनिकांचे वाटप केले जाते. परंतु या प्रकरणात केवळ मसुदा परिशिष्ट-२ प्रसिद्ध झालेले असताना व तेसुद्धा मुंबई महानगरपालिकेने केलेले असताना नियमबाह्य पद्धतीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बाधित नागरिकांना सदनिका वाटप करीत आहे.

इतकेच नव्हे तर ५ जुलैपर्यंत न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणत्याही बाधितांना हटविण्यास मनाई असतानासुद्धा २४ तासांच्या आत घरे रिकामी न केल्यास जबरदस्ती घराबाहेर काढण्याची धमकी एमएमआरडीए व मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली होती, याविरोधात आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली व उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली होती.

गिरगाव येथील बाधितांना जागेच्या इतकीच जागा स्थानिक ठिकाणी देऊन पुनर्वसन करण्याचा धोरणात्मक निर्णय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता, त्याच धर्तीवर मालाड पूर्व येथील बाधितांचेसुद्धा पुनर्वसन झाले पाहिजे, अशी मागणी आगामी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचेसुद्धा आमदार अतुल भातखळकर म्हणाले.

------------------------------------

Web Title: Rehabilitation will not be allowed under the umbrella of ordinary Mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.