उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर आज गुरुवारी (११ मे) जाहीर होणार आहे. दहा महिने युक्तिवाद चाललेल्या खटल्याची १६ मार्च रोजी सुनावणी पूर्ण झाली होती, तेव्हापासून निकालाची प्रतीक्षा होती. यात प्रामुख्याने ठाकरेंची साथ सोडून गुवाहाटीला गेलेले शिंदसह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरणार की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूतीचे घटनापीठ निर्णय कोर्टाच्या या निकालावरच शिंदे फडणवीस सरकारचे भवितव्य अवलंबून असेल. त्यामुळे, या निकालानंतर सरकार राहणार की कोसळणार यावर मंथन सुरू आहे. त्यातच, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं विधानही चर्चेत आहे.
सरन्यायाधीश चंद्रचूड हे एकटेच निकालाचे वाचन करण्याची शक्यता आहे. कारण, सर्वसहमतीने निर्णय असण्याचे हे संकेत आहेत. निकालात मतभिन्नता असेल तर दोन न्यायमूर्ती वेगवेगळे निकाल वाचन करण्याची प्रथा आहे. मात्र, निकाला काहीही आला तर देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. यावरुन, विविध नेतेमंडळी आणि कायदेतज्ज्ञ आपली मतं मांडताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही यावेळी केलेली टिपण्णी महत्त्वपूर्ण आहे.
समजा, शिंदे सरकार बेकायदेशीर असल्याचं ठरलं, जुन्या सरकारला पुन्हा सत्ता दिली. तर, गेल्या वर्षभरात जे निर्णय घेतले ते उलट फिरवायचे का, जो निधी दिला, कामं झाली त्याचं तुम्ही काय करणार? असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच, ११ महिन्यानंतर पुन्हा जुनं सरकार प्रस्थापित करणं, ज्यांच्याकडे बहुमत नाही, ते व्यवहार्य ठरणार नाही, असेही चव्हाण यांनी म्हटलं.
दरम्यान, शिंदे गटाच्या १६ आमदारांनी व्हीपचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाल्यास ते अध्यक्षांकडे सोपवू शकते अन् सिद्ध न झाल्यास क्लीन चिट देऊ शकते. पण आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल काहीही आला तरीही बहुमत असल्यामुळे भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला कुठलाही धोका नसेल. फक्त शिंदेंना पायउतार करून त्यांना दुसरा चेहरा मुख्यमंत्रिपदी वावा लागेल, तसे झाल्यास शिवसेनेऐवजी भाजपच्या नेत्याला या पदावर संधी मिळू शकते.