गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याला नकार
By admin | Published: June 26, 2016 03:28 AM2016-06-26T03:28:18+5:302016-06-26T03:28:18+5:30
गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यासाठी (जेएमएलआर) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधून (एसजीएनपी) बोगदा टाकण्यासाठी भू-तांत्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे़ मात्र यासाठी सल्लागार नेमण्याची
मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यासाठी (जेएमएलआर) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधून (एसजीएनपी) बोगदा टाकण्यासाठी भू-तांत्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे़ मात्र यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू असताना एसजीएनपी प्राधिकरणाने नकारघंटा वाजवली आहे़ त्यामुळे पालिका प्रशासनाने आता राज्याचे प्रधान सचिव (वन) यांना पत्र पाठवून या प्रकल्पाला प्राधान्य देण्याचे साकडे घातले आहे़
जेएमएलआर या प्रकल्पासाठी पालिकेने आयआयटी मुंबई या संस्थेकडून सल्ला घेतला होता़ त्यानुसार या संस्थेने एसजीएनपीमधून बोगदा टाकण्यापूर्वी जमिनीतील किमान २० मीटरपर्यंतच्या मातीची चाचणी करून अंदाज घेणे आवश्यक असल्याचे म्हटले़ त्यामुळे पालिकेने प्रधान सचिव विकास खारगे आणि एनजीएनपी प्राधिकरणाला पत्र पाठवून ही चाचपणी कशी महत्त्वाची आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे़
या प्रकल्पासाठी १३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे़ मात्र पालिकेने तूर्तास २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात तिनशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे़ या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी सल्लागार नेमण्यास स्थायी समितीने मे २०१६मध्ये मंजुरी दिली़ मात्र एसजीएनपीमधील प्रस्तावित बोगद्यामुळे आता प्रकल्पाचा
खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)
भू-तांत्रिक सर्वेक्षण़़़
भू-तांत्रिक सर्वेक्षणामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कोणत्या प्रकारचा बोगदा टाकणे शक्य आहे, याचा अंदाज येणार आहे़ पालिकेने या ठिकाणी ९ कि़मी़ लांब अथवा
६ कि़मी लांब अशा दोन बोगद्यांचा पर्याय समोर ठेवला आहे़
जीएमएलआरचा फायदा असा़़ वाहतूककोंडी फोडण्यासाठी हा प्रकल्प रामबाय उपाय ठरणार आहे़ पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या या रस्त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरून सुरू झालेला
प्रवास एलबीएस मार्ग मुलुंड येथे पूर्ण होऊ शकेल़
एसजीएनपीचा विरोध का?
या सर्वेक्षणामुळे येथील वन्य जीवनामध्ये बाधा येईल, अशी भीती असल्याने एनजीएनपीने भू-तांत्रिक सर्वेक्षण नाकारले असल्याचे सांगण्यात येते़