सायबर पोलिसांची ‘पुडी’ लागू : स्वत:च मुंबईत परतल्यानंतर केली अटकजयेश शिरसाट - मुंबईआरोपी पकडण्यासाठी फक्त पाठलागावर अवलंबून न राहता पोलीस निरनिराळ्या युक्त्या योजतात. अशीच एक भन्नाट युक्ती करून सायबर पोलिसांनी सातासमुद्रापार दडलेल्या आरोपीला एका झटक्यात पकडले. तुझ्या बँक खात्यात अडीच लाख कुठून आले, हा सायबर पोलिसांचा सवाल ऐकून सौदी अरेबियातले बस्तान आवरून आरोपी स्वत:च मुंबईत दाखल झाला.वसीक लुकमन अली (४३) याची ही कहाणी आहे. मुंबईतल्या उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाकडे तो ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. काही महिन्यांपूर्वी मालकाशी वाद झाल्याने त्याने ती नोकरी सोडली. पुढे तो सौदीमध्ये गेला. तेथेही तो ड्रायव्हर म्हणूनच काम करीत होता. मात्र मालकाने दिलेली अपमानास्पद वागणूक त्याला बोचत होती. वचपा काढण्यासाठी वसीकने इंटरनेट कॉलिंग अॅपवरून मालकाच्या मुलीला फोन करून बीभत्स, अश्लील संभाषण सुरू केले. २४ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या महिनाभरात वसीकने निनावी फोन करून मालकासह कुटुंबाला त्रास दिला. मालकाच्या मुलीवर, तिच्या अभ्यासावर परिणाम जाणवू लागला. अखेर या कुटुंबाने वांद्रे-कुर्ला संकुलातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.एसीपी नंदकिशोर मोरे, वरिष्ठ निरीक्षक सुनील घोसाळकर आणि पथकाने केलेल्या चौकशीत त्या फोनवरील आवाज पूर्वी ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या वसीकचा असावा, असा संशय कुटुंबाने व्यक्त केला. त्याचा जुना मोबाइल नंबरही दिला. पथकाने वेळ न दवडता तपास सुरू केला. मात्र वसीकने नोकरीसाठी सौदी गाठल्याची माहिती हाती आली. सौदीत जाऊन वसीकला पकडणे शक्य नसल्याने त्यालाच मुंबईत बोलवावे, या विचाराने पथकाने नामी शक्कल लढवली.पथकाने वसीकच्या भावाशी संपर्क साधला. खासगी बँकेतील एका खात्यावर अडीच लाख जमा झालेत. खातेधारकाच्या कागदपत्रांमध्ये जो मोबाइल नंबर आहे तो तुझ्या भावाचा (वसीक) आहे. या खात्यातले व्यवहार संशयास्पद असून भावाची चौकशी करावी लागेल, अशी पुडी सायबर पोलिसांनी सोडली. हा निरोप वसीकपर्यंत पोहोचला आणि त्याच्या डोळ्यांसमोर अडीच लाख रुपये तरळू लागले. त्याने तडक सौदीतले बस्तान आवरले आणि मुंबई गाठली. हे खाते आपलेच, त्यात जमा झालेले अडीच लाखही आपलेच या आविर्भावात वसीक सायबर पोलिसांना सामोरा गेला आणि फसला. वसीकने संबंधित फोन नंबर आपलाच असल्याचे कबूल करताच सायबर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पहिल्या प्रथम त्याच्या मोबाइलची झाडाझडती झाली. त्यातून तरुणीला फोन करणारा वसीकच असल्याचे स्पष्ट झाले. लागलीच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.नव्या अॅपमुळे पोलीसही आश्चर्यचकितवसीकने या मुलीला फोन फिरवण्यासाठी चार नव्या इंटरनेट कॉलिंग अॅपचा वापर केला होता. हे चार अॅप सायबर पोलिसांसाठीही नवे होते किंवा या गुन्ह्याच्या तपासातून हेही अॅप इंटरनेट कॉलिंगसाठी वापरतात याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. या अॅपमुळे फोन करणाऱ्याचा मोबाइल नंबर दडविला जातो. २ हजार रुपयांवरून रामायणमुंबईतल्या नोकरीत वसीकच्या हातून मालकाच्या कारला अपघात घडला. कारचे किरकोळ नुकसान झाले. रागाच्या भरात मालकाने वसीकच्या पगारातून २ हजार रुपये कापले आणि त्याला ओरडला. हे वसीकने मनाला लावून घेतले. पुढे सौदीत गेल्यावर आता आपल्याला कोण पकडणार, या अति आत्मविश्वासातूल वसीकने मालकाच्या मुलीला फोन फिरवले. त्याचा इरादा मालकाला मनस्ताप देण्याचा होता.
थापेमुळे परतला सौदी अरेबियातून आरोपी
By admin | Published: January 03, 2015 2:14 AM