Join us

मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यानेही त्यांना नाकारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:09 AM

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकही फिरवतात पाठ; स्माशानभूमीतील कर्मचारीच करतात अंत्यसंस्कारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मागील दाेन दिवस काेराेना ...

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकही फिरवतात पाठ; स्माशानभूमीतील कर्मचारीच करतात अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मागील दाेन दिवस काेराेना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र त्यापूर्वी रोज किमान १० ते १२ कोरोना रुग्णांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आणले जात होते. काही मृतदेहांसोबत एक ते दोन नातेवाईक असायचे तर काहींसोबत नसायचे. ज्यांच्यासाेबत नातेवाईक नसायचे त्या मृतदेहांवर आम्हीच नातेवाईक बनून अंत्यसंस्कार करताे. हे सगळे करताना आम्ही पीपीई किट परिधान करताे. गेल्या कित्येक महिन्यांपासून अशीच अवस्था असल्याचे कुर्ला पश्चिमकेडील सोनापूर गल्ली येथील हिंदू स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

कोरोनाचा कहर झाल्यापासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूत भरच पडत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील स्मशानभूमीमध्ये कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असून, एका दिवसाला कोरोना रुग्णांचे १० ते १२ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत आहेत. कुर्ला येथील सोनापूर गल्लीतल्या हिंदू स्मशानभूमीत कोरोना रुग्णांसह इतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कैलास मसाळ, संतोष सातपुते, नामदेव पवार, शांती मिश्रा आणि महेंद्र यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आता जरा परिस्थिती बरी आहे. म्हणजे कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यापासून मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे.

मात्र, गेल्या कित्येक महिन्यांपासून रोज १० ते १२ कोरोना रुग्णांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत आहेत. आम्ही दहा कर्मचारी येथे काम करतो. सर्वसाधारण मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना पीपीई किटची गरज भासत नाही. मात्र कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करताना पीपीई किटसह कोरोनाचे सगळे नियम पाळावे लागतात. मृत व्यक्तीचे नातेवाईक आले असतील तर त्या एक ते दोन नातेवाइकांसमोर अंत्यसंस्कार केले जातात. त्यांना देखील दूर उभे केले जाते. ज्या मृत व्यक्तीसोबत कोणी नसते त्यांच्यावरही आम्ही अंत्यसंस्कार करतो.

* आरोग्याची काळजी घेतो

गेल्या कित्येक दिवसांपासून, महिन्यांपासून असेच सुरू आहे. हे सगळे कधी संपणार, माहीत नाही. मात्र हे सगळे करताना आम्ही आमच्या आरोग्याची, इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घेतो, असे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

* लवकारात लवकर काेराेनावर नियंत्रण मिळावे

आम्ही १० माणसे आहोत. वेळेनुसार किंवा आवश्यकतेप्रमाणे आम्ही कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करतो. आरोग्याची काळजी घेतली जाते. लवकारात लवकर काेराेनावर नियंत्रण मिळावे, असे आम्हाला वाटत असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

* येथेच राहताे, घरी जात नाही

आम्ही येथेच राहतो, घरी जात नाही. कारण आम्ही घरी गेलो आणि आमच्यामुळे कोणाला इन्फेक्शन झाले तर आणखी समस्या निर्माण होतील. परिणामी कधी तरीच आम्ही जात असल्याचे स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

* दोनच नातेवाइकांना प्रवेश

केवळ दोनच नातेवाइकांना अंत्यसंस्कारावेळी प्रवेश दिला जातो. त्यांनाही लांब उभे केले जाते, कारण एवढेच की कोणाला संसर्ग होऊ नये. त्यांच्यासमोर मृतदेहाला अग्नी दिला जातो. आम्हीच सगळे करतो, असेही या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

..............................