याकूबवरील खर्चाची माहिती देण्यास नकार
By Admin | Published: October 2, 2015 04:02 AM2015-10-02T04:02:41+5:302015-10-02T04:02:41+5:30
स्वच्छ व पारदर्शी कारभाराचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी फाशी दिलेल्या याकूब मेमनवर केलेल्या खर्चाची माहिती देण्यास नकार दिला आहे
मुंबई : स्वच्छ व पारदर्शी कारभाराचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी फाशी दिलेल्या याकूब मेमनवर केलेल्या खर्चाची माहिती देण्यास नकार दिला आहे. ही माहिती दिल्यास देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला बाधा पोहोचेल, असा अजब तर्क गृह विभागाने काढला आहे.
१९९३च्या बॉम्बस्फोटाप्रकरणी जुलै महिन्यात याकूब मेमनला फाशी देण्यात आली आहे. त्याबाबत राजकीय पक्षाबरोबरच विचारवंत व विविध क्षेत्रातील मान्यवरांमध्ये मतभेद होते, त्यामुळे हा विषय अनेक
दिवस चर्चेत राहिला. याकूब मेमनला अटक झाल्यापासून ते फासावर लटकवेपर्यंत शासनाला एकूण किती खर्च आला, अशी माहिती अनिल गलगली यांनी राज्याच्या गृह विभागाकडे मागितली होती. पण गृह विभागाचे जन माहिती आणि कक्ष अधिकारी दीपक जडीये यांनी माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ मधील ८(१)(क) अन्वये ही माहिती देण्यास नकार दिला आहे.
अर्जदाराने मागितलेली माहिती दिल्यास भारताच्या सार्वभौमत्वाला किंवा एकात्मकेस आणि
सुरक्षेला बाधा पोहोचेल, असे उत्तरही जन माहिती अधिकाऱ्याने
दिले आहे. याविरोधात गलगली यांनी उप सचिवांकडे अपील दाखल केले आहे.