शालेय वस्तूंऐवजी रक्कम देण्याचा प्रस्ताव फेटाळला
By admin | Published: July 9, 2015 01:50 AM2015-07-09T01:50:09+5:302015-07-09T01:50:09+5:30
पालिका शाळांनाही हायटेक करण्यासाठी विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने शालेय वस्तूंपासून मात्र विद्यार्थ्यांना वंचित ठेवले आहे़
मुंबई : पालिका शाळांनाही हायटेक करण्यासाठी विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने शालेय वस्तूंपासून मात्र विद्यार्थ्यांना वंचित ठेवले आहे़ काही शालेय वस्तू खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बँकेत पैसे जमा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे आज आणला़ यास विरोधी पक्षांनी मंजुरी दिली, मात्र शिवसेना-भाजपा युतीने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव दप्तरी दाखल (फेटाळला) केला़ यामुळे विद्यार्थ्यांना यंदा शालेय वस्तू मिळणे दुर्लभच असल्याचे चित्र आहे़
शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना २७ शैक्षणिक साहित्याचे वाटप पालिका करीत असते़ मात्र या वर्षी शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप एकही वस्तू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली नाही़ निविदा प्रक्रिया लांबल्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी महिनाभर या वस्तूंची वाट पाहावी लागणार आहे़ त्यामुळे तूर्तास पाण्याची बाटली, जेवणाचा डबा आणि दप्तर या तीन वस्तूंसाठी लागणारी रक्कम देण्याचा निर्णय आयुक्त अजय मेहता यांनी घेतला़
मात्र, या निर्णयाला सर्वपक्षीय गटनेत्यांनी विरोध केला होता़ तरीही प्रशासनाने आज हा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आणला़ या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि समाजवादी पक्षाने आपला विरोध मागे घेत विद्यार्थ्यांना पैसे देण्यास मंजुरी दर्शविली़ परंतु पैसे दिल्यास विद्यार्थ्यांपर्यंत वस्तू कधीच पोहोचणार नाहीत, असा युक्तिवाद मांडत सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने हा प्रस्ताव बहुमताने दप्तरी दाखल केला़ (प्रतिनिधी)
२००७ पासून विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले जात आहे़ गणवेश, बूट व मोजे, पुस्तक, वह्या, दप्तर, छत्री, रेनकोट, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली असे २७ शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात येतात़ गेल्या सप्टेंबरपासून या वस्तू खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया पालिकेने सुरू केली़