Join us

महानगरात नात्यातील वीण निसटतेय; ५ वर्षात ३५ हजार जोडप्यांनी घेतले घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 11:30 PM

सरत्या वर्षात ७६०० जोडीदारांची कोर्टात धाव; अकरा हजारावर प्रकरणे प्रलंबित

ठळक मुद्दे सरत्या वर्षात तब्बल ७ हजार ६०८ दाम्पत्यांनी परस्परांपासून दूर राहण्यासाठी कोर्टाची पायरी चढली आहे.२०१७ मध्ये त्याचे प्रमाण अनुक्रमे ७५१८ व ६८८० इतके होते. २०१४, २०१५ व २०१६ मध्ये अनुक्रमे ७२५०, ६९५२ व ७०८८ इतके खटले दाखल होती.

जमीर काझी

मुंबई - सात जन्मी एकच पती मिळावा, अशी संस्कृती सांगणाऱ्या भारतीय परंपरेतील पती-पत्नीच्या नात्यातील वीण निसटू लागली आहे. देशाची आर्थिक राजधानीत घटस्फोटाचा आलेख वाढत चालला असून गेल्या पाच वर्षात मुंबईत तब्बल ३४ हजार ५२३ जोडपी विभक्त झाली आहेत. सरत्या वर्षात तब्बल ७ हजार ६०८ दाम्पत्यांनी परस्परांपासून दूर राहण्यासाठी कोर्टाची पायरी चढली आहे.

बदलती जीवन शैली, चंगळवाद व राहणीमानामुळे घटस्फोटाचे झपाट्याने वाढत आहे.पाच वर्षात ३६ हजार ४१६ जोडीदारांनी काडीमोड घेण्यासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेतली. त्यापैकी ३४ हजार ५२३ जोडपी परस्परापासून विभक्त झालेली आहेत. तर ११ हजार ४११ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे विवाह संस्कृतीवरील आक्रमण वाढत असल्याचे स्पष्ट होते.

वांद्रे येथील कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी रोज सरासरी २१ अर्ज दाखल होत असून स्त्री व पुरुषाचे प्रमाण जवळपास सारखेच राहिले आहे. विशेषत: नोकरी करणाऱ्या, स्वत:च्या पायावर उभ्या असलेल्या महिलाही विभक्त रहाण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेत आहेत. १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत तब्बल ३६ हजार ४१६ जणांनी घटस्फोट घेण्यासाठी कोर्टाची पायरी चढली आहे. त्यामध्ये एकतर्फी व परस्पर संमतीने विभक्त होण्याचे प्रमाण अनुक्रमे ७० व ३० टक्के इतके आहे. २०१८ मध्ये विभक्त होण्यासाठी ७,६०८ जणांनी अर्ज दाखल केले होते. तर ६,८५१ प्रकरणे निकालात निघाली. २०१७ मध्ये त्याचे प्रमाण अनुक्रमे ७५१८ व ६८८० इतके होते. २०१४, २०१५ व २०१६ मध्ये अनुक्रमे ७२५०, ६९५२ व ७०८८ इतके खटले दाखल होती.

बदलती जीवनशैली, सोशल मीडिया मारक ठरतेय

बदलेली जीवनशैली, राहणीमान सोशल मिडीयाचा वाढता वापर घटस्फोटाला कारणीभूत ठरत आहे. आर्थिक सबलतेमुळे नोकरदार दाम्पत्य पटत नसल्यास संमतीने परस्परापासून दूर होत आहेत. पतीचे विवाहबाह्य संबंध हे विभक्त होण्याचे मुख्य कारण होत असे. आता त्यामध्ये महिलांचे प्रमाणही वाढत आहे. व्हॉट्स, फेसबुक, इन्ट्राग्राम ,ट्विटरमुळे घरबसल्या जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील व्यक्ती संपर्कात येते, त्यातून सोशल मिडीयाचा अतिवापर विवाह संस्कृतीला मारक ठरत आहे.

अ‍ॅड. सिद्धार्थ शहा( जेष्ठ विधीज्ञ व समुपदेशक)

--------------------

सिंगल फॅमिलीमुळे जोडप्यांतील विसंवादात वाढ

एकत्रित कुटुंबामध्ये जेष्ठ व्यक्तीचा आदरयुक्त धाक रहात होता. ते पती-पत्नीतील वाद ,दुरावा ते मिटवित असत. मात्र सद्या नोकरदार जोडपी, अपुरी जागा आदी कारणामुळे ‘सिंगल फॅमिली’निर्माण होणारे वाद मिटण्यापेक्षा चव्हाट्यावर येतात. त्यांना समजावून सांगणारी व्यक्ती नसल्याने घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ होत आहे.

अ‍ॅड. रवि जाधव ( जेष्ठ विधीज्ञ)

कुटुंब न्यायालयात पाच वर्षातील दाखल प्रकरणे

वर्ष        शिल्लक          दाखल            निकाली

२०१४     ९३३१              ७२५०              ६९०६

२०१५    ९६७५               ६९५२              ७१३९

२०१६     ९६३०             ७०८८               ६७४७

२०१७    १००१६           ७५१८                ६८८०

२०१८    १०६५४            ७६०८              ६८५१

एकुण    ४९,३०६         ३६,४१६           ३४,५२३

टॅग्स :घटस्फोटन्यायालयपरिवार