तानसा नदी प्रदूषणाच्या विळख्यात
By admin | Published: February 9, 2015 10:51 PM2015-02-09T22:51:58+5:302015-02-09T22:51:58+5:30
वसई पूर्व भागातील तानसात खराटतारा येथे साडी प्रिंटीग कंपनीने रसायन सोडल्याने या ठिकाणचे पात्र मोठ्या प्रमाणात प्रदुषित झाले
पारोळ : वसई पूर्व भागातील तानसात खराटतारा येथे साडी प्रिंटीग कंपनीने रसायन सोडल्याने या ठिकाणचे पात्र मोठ्या प्रमाणात प्रदुषित झाले असून त्यात मासेमारी करणे धोक्याचे आहे. हे नदीचे क्षेत्र वसई विरार महानगर पालिकेच्या क्षेत्रात येत असून हे प्रदूषण दोन वर्षांपासून होत असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
तानसा नदीच्या पात्राच्या कडेला ही प्रिंटीग कंपनी आहे. कापड प्रिंट करून जे प्रदूषित रंगीत रसायन निघते ते या पात्रात सोडले जाते. या भागातील नागरिक नदीच्या पात्रातून मासेमारी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. पण ह्या प्रदुषित पाण्यामुळे मासेमारी करणे धोक्याचे झाले आहे. या पाण्यामुळे मासेमारी करताना पाण्याला रसायनाचा वास येत असून या पाण्यामुळे अंगाला खाज सुटते. शिवाय या प्रदूषणामुळे नदीतील मासेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असे अजित घरत यांनी सांगितले. तानसाचे पात्र दूषित होणे ही या भागातील नागरिकांच्या दृष्टीने घातक बाब आहे. काही वर्षांपूर्वी प्रदूषित पाण्यातील मासे खाल्ल्याने खानिवडे गावातील दोन नागरिकांचा बळी गेला होता. या प्रदूषित पाण्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. कारण याच नदीच्या पाण्याचा शिरवली येथून वसई विरार शहराला पुरवठा केला जातो. गेल्या वर्षी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केल्याने कंपनीने रसायन सोडणे बंद केले. आता मात्र तिने तक्रारीला केराची टोपली दाखवत नदीत पाणी सोडणे पुन्हा चालू केले आहे. यामुळे मच्छीमार चिंताक्रांत आहेत.