मुंबई : "ढोंगी राष्ट्रवादाच्या नावाखाली भाजप देशातील वातावरण रक्तरंजित करत असून, अनेक अतिरेकी कारवायांत सापडलेले आरोपी व भाजपचे घनिष्ठ संबंध उघड झाले आहेत. पुलवामा घटना, उदयपूरमधील कन्हैयालालची हत्या, आसाममध्ये अतिरेक्यांना टेरर फंडिग करणारा निरंजन होजाई, या सर्व प्रकरणांतील मुख्य आरोपींचे भाजपशी संबंध उघड झाले आहे अशी" टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. अजयकुमार यांनी केली.
गांधी भवन येथे बोलताना डॉ. अजयकुमार म्हणाले की, कन्हैयालाल हत्येतील आरोपी मोहम्मद अटारी भाजपचा कार्यकर्ता निघाला. भाजप नेता गुलाबचंद कटारिया यांच्या जावयाच्या कंपनीत तो कामाला होता. भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी त्याचे संबंध असल्याचे उघड झाले.
प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, अमरावतीतील उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात अटक झालेल्या इरफान खान याने खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या प्रचारात भाग घेतला होता. राणा दाम्पत्य व भाजपचे उघड संबंध आहेत. २१ जूनला अमरावतीची घटना घडली, तर उदयपूरची घटना २८ तारखेला; पण या दोन्ही घटनांची एनआयएकडून चौकशी करावी, असे पत्र खासदार नवनीत राणा यांनी २७ तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले होते. राणा यांना घटना घडण्याआधीच त्याची चाहूल कशी लागली?