सातासमुद्रापारच्या नात्यांना हवा फक्त मायेचा स्पर्श

By मनीषा म्हात्रे | Published: January 29, 2024 01:11 PM2024-01-29T13:11:42+5:302024-01-29T13:12:25+5:30

Relationships : प्रेमसंबंध.. अनैतिक संबंध.. फसवणूक.. बाल माता.. अविवाहित यातून जन्माला आलेली अपत्ये तसेच हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मातांना त्याग करावी लागलेली मुलं विविध संस्थांच्या माध्यमातून सातासमुद्रापार पोहोचली. विदेशी पालकांच्या मायेच्या उबेने ती लाडाकौतुकात वाढली.

Relationships across seven oceans just need a touch of love | सातासमुद्रापारच्या नात्यांना हवा फक्त मायेचा स्पर्श

सातासमुद्रापारच्या नात्यांना हवा फक्त मायेचा स्पर्श

- मनीषा म्हात्रे 
(वरिष्ठ प्रतिनिधी)

प्रेमसंबंध.. अनैतिक संबंध.. फसवणूक.. बाल माता.. अविवाहित यातून जन्माला आलेली अपत्ये तसेच हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मातांना त्याग करावी लागलेली मुलं विविध संस्थांच्या माध्यमातून सातासमुद्रापार पोहोचली. विदेशी पालकांच्या मायेच्या उबेने ती लाडाकौतुकात वाढली. मात्र, आपल्या जन्मदात्रीपासून दुरावलेल्या या मुलांना आजही मायेचा स्पर्श हवाहवासा वाटतोय आणि हीच मुले आपल्या अस्तित्वाच्या शोधात मुंबईसह महाराष्ट्रातील वेड्यावाकड्या वाटांवरील पाऊलखुणा धुंडाळताना दिसत आहेत.

कुठे प्रेमाची नाळ एकरूप होतेय, तर कुठे आजही नाळ जुळविण्यासाठी धडपड सुरू आहे. दोघींना एकमेकींची भाषा समजत नसली तरी फक्त मायेच्या स्पर्शाने हा संवाद सुरू आहे.  आईचा शोध घेऊन देखील, समाजाच्या भीतीने मंदिर किंवा बाहेरच या मायलेकी एकत्र येत आहेत. मात्र, या भेटीच्या ओढीत एक मिनिटही त्यांना आयुष्य जगायला पुरे असल्याचे दिसले. 

नेदरलँडस्थित अगेंस्ट चाइल्ड ट्रॅफिकिंग ऑर्गनायझेशन काउन्सिलचे अरुण डोल आणि पुण्याच्या ॲडॉप्टी राइट्स काउन्सिलच्या संचालिका ॲड. अंजली पवार यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत असे महाराष्ट्रातून परदेशात दत्तक म्हणून गेलेल्या ८० जणांची दुरावलेली नाळ पुन्हा जुळली आहे. आजही अनेक प्रकरणांचा शोध सुरू आहे.
अरुण डोल यांना देखील जर्मनीच्या कुटुंबीयांनी दत्तक घेतले. वयाच्या १४ व्या वर्षापासून त्यांनी आईचा शोध सुरू केला. अखेर, अनेक खडतर प्रवास पार करून त्यांची कुटुंबीयांसोबत भेट झाली. मात्र, या खडतर प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवातून त्यांनी अशा प्रकारे कुटुंबीयांपासून दुरावलेली नाळ जोडण्याचे काम सुरू केले. महाराष्ट्रात पुण्याच्या ॲड. अंजली पवार यांच्या मदतीने हे कार्य सुरू आहे. त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणजे आईचा शोध घेतल्यानंतर एका परदेशी  तरुणीने तिच्या मुलीला अंजली हे नाव  दिले होते. 

ॲड. अंजली पवार सांगतात, ही प्रकरणे हाताळताना खूप काळजी घ्यावी लागते. कुठलीही माहिती कुणालाही न समजता शोध घेणे आव्हानात्मक असते. यादरम्यान संस्थांकडून माहिती मिळविण्यात बराच पाठपुरावा करावा लागतो. अथक प्रयत्नानंतर आईची भेट होते तेव्हा मिळणारे समधान शब्दात सांगता येणार नसल्याचे त्या सांगतात.
दुसरीकडे महाराष्ट्रासह भारतात दत्तक प्रक्रियेबाबत कठोर पावले उचलणे गरजेचे बनले आहे. सीबीआयने बेकायदेशीर मूल दत्तक रॅकेटमध्ये मार्च २०११ मध्ये पुण्यातील प्रीत मंदिर संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त जोगिंदर सिंग भसीन (७३), त्यांची पत्नी महिंदर (७०) आणि मुलगा गुरप्रीत (७०) यांच्यासह सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यासोबतच बाल दत्तक संसाधन एजन्सीचे (कारा) माजी अध्यक्ष जैनेंद्र कुमार मित्तल यांच्यावरही अटकेची कारवाई झाल्याने खळबळ उडाली. 

दत्तक प्रक्रियेचे प्रमुखच रॅकेट चालवत असल्याने या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. आजही काही ठिकाणी बेकायदा दत्तक प्रक्रिया सुरू असून त्याबाबत प्रशासनाने दखल घ्यायला हवी. महिलांच्या आर्थिक परिस्थितीसह काही बाळ विक्रीतील रॅकेटही या दत्तक प्रक्रियेशी जोडले गेल्याचा संशय आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत जन्मदात्या पालकांनी ड्रग्जच्या नशेसाठी पैसे कमी पडले म्हणून पोटच्या गोळ्याला विकल्याची धक्कादायक बाब  समोर आली होती. परदेशी तसेच भारतीय नागरिकांना मूल दत्तक घ्यायचे असल्यास ‘कारा’च्या अधिकृत संकेस्थळावर अर्ज करावा लागतो. अर्जानुसार संबंधितांना क्रमांक मिळतो. मात्र हा क्रमांकही वर- खाली होत असल्याचा सूर ऐकू येत आहे. याकडेही विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

 

 

Web Title: Relationships across seven oceans just need a touch of love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.