अपघातग्रस्तांचे नातेवाईक रोखणार अपघात, रस्ता सुरक्षा जागृती, अपघातप्रवण क्षेत्रात लावले बॅनर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 06:20 AM2017-11-24T06:20:20+5:302017-11-24T06:20:32+5:30
मुंबई : रस्ते अपघातामुळे अनेक प्रवाशांना मृत्यूस सामोरे जावे लागते. काही अपघात प्रवाशांच्या चुकांमुळे तर काही खराब रस्त्यांमुळे घडतात.
महेश चेमटे
मुंबई : रस्ते अपघातामुळे अनेक प्रवाशांना मृत्यूस सामोरे जावे लागते. काही अपघात प्रवाशांच्या चुकांमुळे तर काही खराब रस्त्यांमुळे घडतात. मुंबई वाहतूक पोलिसांनी अपघात कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीम हाती घेतली आहे. अपघातग्रस्तांच्या नातेवाइकांच्या स्वानुभवातून वाहतुकीचे नियम पाळणारे बॅनर लावण्यात आले आहेत.
मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील अक्षय पेंडसे आणि आनंद अभ्यंकर यांच्या अपघाती निधनानंतर तन्मय पेंडसे याने रस्ता सुरक्षा मोहीम राबवली. ‘माझा भाऊ आणि २ वर्षांचा पुतण्या बेजबाबदार ट्रकचालकाच्या चुकीमुळे रस्ता अपघातात दगावले, त्यांच्या निधनामुळे आमच्या कुटुंबात झालेली पोकळी कधीही भरून येणार नाही. वाहने जबाबदारीने चालवा’, असा संदेश या बॅनरवर आहे. अक्षय पेंडसे आणि २ वर्षांचा पुतण्या यांचे छायाचित्रदेखील बॅनरवर आहे.
धारावी टी जंक्शन, भायखळा येथील खडा पारसी, सीएसएमटी येथील कॅपिटल सिनेमा परिसर, बाबूलनाथ अशा काही अपघातप्रवण क्षेत्रात बॅनर लावले आहेत.
>आवाहन नको कृती हवी
मुंबई वाहतूक पोलिसांच्या नवीन बॅनरमुळे प्रवाशांमध्ये कुतूहल निर्माण होत आहे. नवीन बॅनरमध्ये कुठेही 'आवाहन' या शब्दाचा वापर करण्यात आलेली नाही. 'आवाहन करण्यात आले', या पारंपरिक वाक्यांना छेद देत केवळ अपघाताची माहिती देत सत्य परिस्थिती मांडण्यात आली आहे. सद्य:स्थितीत अपघात रोखण्यासाठी केवळ आवाहन नको कृतीची आवश्यकता असल्याचे वाहतूक पोलीस अधिकारी सांगतात.
अपघात रोखण्याची जबाबदारी केवळ शासनाची नसून प्रत्येक वाहनचालकाचीदेखील आहे. केवळ सरकारवर टीका न करता समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करा. दुसºयाच्या निष्काळजीपणामुळे आपला अपघात होतो. तसेच आपल्या निष्काळजीमुळेही एखाद्याचे प्राण जाऊ शकतात, याचा विचार करा. - तन्मय पेंडसे
जनजागृतीसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अपघातग्रस्त नातेवाईकांची सद्यस्थिती, त्यांचे अनुभव या आशयाचे बॅनर शहरात लावले आहेत. अपघात रोखण्यासाठी लोकसहभागातून भविष्यात असे विविध उपक्रम राबविण्यात येतील.
- अमितेशकुमार, सह-आयुक्त, वाहतूक पोलीस