Join us

कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कॅन्सरग्रस्त रुग्णांचे नातेवाईक आणि साहाय्यासाठी असलेल्यांच्या निवासाची सोय करता यावी यासाठी म्हाडाच्या १८८ उपलब्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कॅन्सरग्रस्त रुग्णांचे नातेवाईक आणि साहाय्यासाठी असलेल्यांच्या निवासाची सोय करता यावी यासाठी म्हाडाच्या १८८ उपलब्ध असलेल्या गाळ्यांपैकी १०० गाळे टाटा मेमोरियल रुग्णालयाला हस्तांतरित केल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

म्हाडा आणि परळ येथील टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाइकांच्या निवासाच्या सोयी संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत गृहनिर्माणमंत्री आव्हाड म्हणाले की, टाटा रुग्णालयात देशभरातून कॅन्सरग्रस्त रुग्ण येत असतात. सोबतच त्यांचे नातेवाईक, काळजीवाहू व्यक्ती येतात. परंतु त्यांच्या राहण्याची व्यवस्था नसल्याने किंवा खासगी सोय आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने बरेचदा नातेवाइकांना फुटपाथवर रहावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी रुग्णालयाशेजारी असलेल्या परेल शिवडी विभाग, महादेव पालव मार्ग, डॉ. बी. ए. रोड, करी रोड मुंबई येथील हाजी कासम चाळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मालमत्तेच्या समूह पुनर्विकास योजनेमधून मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळास एकूण १८८ गाळे प्राप्त झाले आहेत. यापैकी सद्य:स्थितीत ३०० चौरस फुटाचे १०० गाळे टाटा मेमोरियल रुग्णालयास उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यावेळी गाळ्यांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी टाटा मेमोरियल रुग्णालयाला देण्यात आली असून, गृहनिर्माण विभाग व टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्यामध्ये लवकरच कारारनामा करण्यात येणार आहे. उर्वरित गाळे लवकरच टाटा मेमोरियल रुग्णालयाला सुपूर्द करण्यात येईल, असेही आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी टाटा रुग्णालयाचे संचालक डॉक्टर शैलेश श्रीखंडे, म्हाडाचे अनिल डिग्गीकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे आदी अधिकारी उपस्थित होते.