कोविड रुग्ण मृत पावल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना मिळत नाहीत त्यांच्या वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:06 AM2021-06-06T04:06:16+5:302021-06-06T04:06:16+5:30
माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत; मुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्याची विनंती मनोहर कुंभेजकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्ण मृत ...
माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत; मुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्याची विनंती
मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्ण मृत पावल्यानंतर त्याच्याजवळ असलेले पाकीट, डेबिट कार्ड्स, ज्वेलरी या महत्त्वाच्या वस्तू त्याच्या नातेवाईकांना मिळाल्या नाहीत, अशा अनेक तक्रारी महाराष्ट्रभरातून येत आहेत. राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे गोरेगाव पूर्व नेस्को कोविड सेंटर व अन्य ठिकाणांवरून अनेक तक्रारी आल्या आहेत. मृतांच्या वस्तू त्यांच्या जवळच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना विनंती केली असल्याची माहिती डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या तक्रारीची दखल घेतली असून, पुढच्या आठवड्यात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, पोलीस अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन राज्यासाठी पॉलिसी ठरविण्यात येईल, असे आश्वासन सुभाष देसाई यांनी दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
सांताक्रूझ येथील एक कोविड रुग्ण नेस्को कोविड सेंटरमध्ये मृत होऊन चार महिने झाले, मात्र अजूनही त्याच्या वस्तू त्याच्या नातेवाईकांना देण्यात आलेल्या नाहीत. आपल्या समक्ष मृताच्या नातेवाईकाने नेस्को कोविड सेंटरच्या प्रशासनाकडे नुकतीच कैफियत मांडली होती, अशी माहिती डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
कोरोना काळात मृत रुग्णाचे शव मिळण्यासाठी सात ते आठ तासांचा कालावधी लागायचा, तोही कमी होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.
कोविड रुग्णाची एकूण परिस्थिती काय आहे, याची चिंता घरातल्या व्यक्तींना असते. त्यामुळे सदर व्यवस्था जरी उपलब्ध असली तरी ती कार्यक्षम नाही. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक चिंतेत असतात. ही परिस्थिती सर्वत्रच आहे. त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीची माहिती त्याच्या नातेवाईकांना मिळण्यासाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. सावंत यांनी व्यक्त केले.
............................................................................