नातेवाईकांनो कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत तुमचीही सोय; टाटा रुग्णालयाला म्हाडाकडून १०० फ्लॅट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 06:20 AM2023-03-29T06:20:51+5:302023-03-29T06:20:59+5:30
रुग्णालयात सहजपणे उपचारासाठी जाता येईल. प्रत्येक फ्लॅट २५५ चौरस फुटांचा आहे.
मुंबई : टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाकडून १०० फ्लॅट देण्यात आले असून त्याचे मंगळवारी माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कॅन्सरग्रस्तांसाठी म्हाडातर्फे लोकार्पण करण्यात आलेल्या १०० फ्लॅटमुळे टाटा रुग्णालयापासून १० मिनिटांच्या अंतरावर रुग्ण आणि नातेवाइकांना राहता येणार आहे. त्यामुळे रुग्णालयात सहजपणे उपचारासाठी जाता येईल. प्रत्येक फ्लॅट २५५ चौरस फुटांचा आहे.
आव्हाड यांनी सांगितले की, म्हाडामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकल्पाबाबत सांगितल्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास येऊ शकला. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांची काही प्रमाणात का होईना राहण्याची सोय होणार आहे. या फ्लॅटमध्ये रुग्णासह त्यांच्या दोन ते चार नातेवाइकांना राहता येईल, अशी स्वतंत्र व्यवस्था आहे. फ्लॅटमध्ये स्वतंत्र किचन, टॉयलेट आणि बाथरूम असून २४ तास पाण्याची सोय आहे. त्याचप्रमाणे झोपण्यासाठी बेडची व्यवस्था केली असून, प्रत्येक फ्लॅटमध्ये फ्रीज देण्यात आला आहे. रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना येथे कुठलाही त्रास होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे.
या फ्लॅटमधील सर्व सुविधा एचडीएफसी एएमसी उत्तरदायित्व निधीतून करण्यात आली आहे. तसेच या खोल्यांच्या व्यवस्थेचे नियोजन रोटरी क्लब ऑफ बॉम्बे करणार आहे. यावेळी टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, एचडीएफसी एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक नवनीत मुनोत, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ चे गव्हर्नर संदीप अगरवाला आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बेचे अध्यक्ष विनीत भटनागर उपस्थित होते.