Join us

नाका कामगार नोंदणीसाठी ९० दिवसांची अट शिथिल करा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 8:14 PM

राज्यव्यापी अभियानाचा समारोप : कामगार मंत्र्यांना साकडे

मुंबई : नाका कामगार नोंदणीसाठी आवश्यक असलेली ९० दिवसांची अट शिथिल करण्याची मागणी भारतीय सेवा नाका कामगार संघटनेने केली आहे. नाका कामगारांसाठी १ डिसेंबर २०१८ ते ३ जानेवारी २०१९ या कालावधीत राबवलेल्या जनजागृती अभियानाचा समारोप गुरूवारी आझाद मैदानात झाला. यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन सादर केले.

संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश राठोड यांनी सांगितले की, महिनाभर ज्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जनजागृती केली, त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे कामगारांच्या समस्या जाणून घेत त्यावर शासनाने तोडगा काढण्याचा निर्धारही करण्यात आला. कंत्राटदारांकडून होणारी कामगारांची फसवणूक यावेळी प्रकर्षाने समोर आली आहे. बहुतेक नाका कामगारांच्या नोंदणीच होत नसल्याने त्यांना शासन योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. विकासकाकडून कामगार ९० दिवस काम करत असल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येत असल्याने नोंदणी करता येत नसल्याचे बहुतेक कामगारांनी सांगितले. त्यामुळे संबंधित अट शिथिल करून कामगारांना योजनांचा लाभ मिळवून देण्यात सरकारने सहकार्य करण्याची मागणी राठोड यांनी केली आहे.

नोंदणीशिवाय संत सेवालाल महाराज यांच्या नावाने नाका व बांधकाम कामगार महामंडळ स्थापन करण्याची मागणी संघटनेने केली आहे. राज्यातील नाका कामगारांचे सर्वेक्षण केले असता, त्यांच्या सर्व अडचणी शासनासमोर येतील, असा संघटनेचा दावा आहे. 

टॅग्स :मुंबई