Join us

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीवरील बंदी या वर्षापूर्ती शिथिल करा; आशिष शेलारांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 4:49 PM

केंद्रीय पर्यावरण विभागाने नुकतेच नोटीफिकेशन काढून यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती वर बंदी घातली.

मुंबई: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती ऐवजी शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीचा आग्रह धरणे निसर्गाच्या दृष्टीने कधीही योग्यच आहे. मात्र यावेळी आलेले कोरोनाचे संकट, त्यामुळे मूर्तिकारांना मिळालेला अपुरा वेळ व अडचणीत आलेली अर्थव्यवस्था या सगळ्याचा विचार करता केवळ या वर्षा पूर्ती केंद्र सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती वर घातलेली बंदी शिथिल करावी, अशी विनंती भाजपाचे नेते आणि माजी मंत्री आमदार अँड.आशिष शेलार यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे केली आहे.

केंद्रीय पर्यावरण विभागाने नुकतेच नोटीफिकेशन काढून यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती वर बंदी घातली. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असणारे प्लास्टर ऑफ पॅरिस वापरात आणू नये असे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतर केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याने याबाबतचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. कोरोनाशी सामना सुरु असताना या ऐनवेळेस आलेल्या बंदीमुळे गणेशमूर्तीकार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अडचणीत आली आहेत. त्यांच्या या अडचणी आशिष शेलार यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्राने कळवून विनंती केली आहे..या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, केंद्राने घेतलेला निर्णय पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य असला तरी या वर्षीच्या कोरोनाच्या संकटाचा विचार करता केवळ एका वर्षापूर्वी ती ही बंदी शिथिल करण्यात यावी अशी विनंती केली आहे.

महाराष्ट्रात गणेशोत्सव सर्वात मोठा सण असून पेण हे गणपतीचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या पेणमध्ये दोहे, हमरापूर, कळवे ,दादर यासारखी अनेक छोटी गावे ही गणपती कारखान्यांचा एक क्लस्टरच आहेत.  गणेश मूर्ती व दुर्गादेवीच्या मुर्ती बनवण्याचे पारंपारिक  सुमारे साडेतीनशेहून अधिक कारखाने या परिसरात आहेत.वर्षभर हे कारखाने गणेशमुर्त्या तयार करण्याचे काम करतात आणि या परिसरातून सुमारे 50 लाख गणेशमुर्त्या  कोकणासह महाराष्ट्राच्या विविध भागात जातात. त्यावर महाराष्ट्रातील अन्य छोटे मुर्तीकार विसंबून आहेत. त्यामुळे ही एक साखळी असून या परिसरातून अमेरिका, अँब्राँडसारख्या देशापर्यंत निर्यात होतात.  असे हे एक उद्योगक्षेत्र असून ते पुर्णपणे अडचणीत आले असल्याचे मत आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे.

आता गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यात या वर्षी कोरोनाचे संकट आल्यामुळे हे गणपतीचे कारखाने अडचणीत आहेत.  हे कारखाने वर्षभर काम करतात त्यांच्या गणेशमूर्ती आता तयार होत असून त्यावर अचानक आता बंदी आणली तर येणाऱ्या पुढील काळात शाडूच्या मातीची मूर्ती बनवण्यासाठी लागणारी शाडूची माती त्यासाठी लागणारे कारागीर, रंग आदी साहित्य सुद्धा उपलब्ध होणार नाही.  त्यामुळे वेळेत गणेशमूर्ती उपलब्ध होऊ शकत नाहीत, तसेच या कारखान्यांमध्ये मूर्ती तयार आहेत त्या कारखान्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार असून एकीकडे कोरोनामुळे अडचणीत आलेले हे कारखानदार पूर्णपणे उद्ध्वस्त होतील, अशी भीती आशिष शेलार यांनी पत्राद्वारे मांडली आहे.

गणेशमूर्ती तसेच त्यानंतर येणाऱ्या दुर्गापूजा हे विशेष श्रद्धेचे आणि महाराष्ट्रात विशेषत: अत्यंत भावनेचे सण आहेत, त्यामुळे कोरोनाचे संकट पाहुन केवळ या वर्षासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वरील बंदी केंद्र सरकारने शिथिल करावी, आणि पुढील वर्षापासून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करुन शाडूच्या मातीसह पर्यावरण पुरक गणेशमूर्ती वापर करण्याचा आग्रह धरावा, अशी विनंती आशिष शेलार यांनी या पत्रात केली आहे

टॅग्स :आशीष शेलारभाजपागणेशोत्सव