अटी शिथिल करून स्थिती पूर्वपदावर आणा, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 03:02 AM2020-05-20T03:02:25+5:302020-05-20T05:36:43+5:30
यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब लागेल. परिणामी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या संख्येत घट होऊन शैक्षणिक संस्था, तंत्रज्ञान संस्था यांच्या उत्पन्नावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुंबई : लॉकडाउनच्या काही अटी शिथिल करून राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणावी लागेल. याकरता दररोज ठराविक वेळ निश्चित करून शासनामार्फत आवश्यक सवलतींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करावी. दुकाने, कार्यालये, खासगी आस्थापना टप्प्याटप्प्याने उघडाव्यात, अशा सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेत केल्या.
शिक्षण अभ्यासगट नेमावा
यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब लागेल. परिणामी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या संख्येत घट होऊन शैक्षणिक संस्था, तंत्रज्ञान संस्था यांच्या उत्पन्नावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. आर्थिक तोटा सहन न झाल्यामुळे काही शैक्षणिक संस्था कोलमडतील अथवा बंद पडण्याची देखील शक्यता आहे. एकंदरीत विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांचे नुकसान होऊ नये, शिक्षणात व्यत्यय येऊ नये याकरता वेळीच उपाययोजना करण्यासाठी एक अभ्यास गट अथवा समिती नेमावी, अशी सूचना पवार यांनी केली.
उद्योगांसाठी नवे धोरण हवे
राज्यात नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, उद्योग वाढीसाठी नवीन सवलतींचे प्रोत्साहनपर धोरण आणणे आवश्यक वाटते. आयात, निर्यात व देशांतर्गत जलवाहतूक वाढवण्याकरता त्या क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योजक व तज्ज्ञ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करावी, असे पवार यांनी सांगितले.
राज्यांतर्गत रस्ते वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आणण्याकरता योग्य ती पाऊले उचलावीत तसेच विमान व रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा, कोरोना इतक्या लवकर हद्दपार होणार नाही. त्यामुळे कोरोनाबाबत जनतेमध्ये व्यापक जागृती घडवणे आवश्यक आहे. कोरोना हा जीवनाचा एक भाग समजून, त्याच्यापासून सावध राहून, आरोग्य सांभाळण्याबाबत जागृती घडवणे आवश्यक आहे. त्यासाठी माहिती-जनसंपर्क विभाग, प्रसारमाध्यमे, जाहिराती यांचा वापर करण्याची सूचना त्यांनी केली.
भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी कृती कार्यक्रम आखा
महाराष्ट्रातील नव्या बेरोजगार पिढीला,
मराठी माणसाला रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यांना उद्योग क्षेत्रात कसे सामावून घेण्यात येईल याचा कृती कार्यक्रम आखावा लागेल, अशीही सूचना पवार यांनी केली.
राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचा जनतेत विश्वास निर्माण व्हावा म्हणून राज्याचे मंत्री आणि अधिकारी यांची उपस्थिती वाढणे आवश्यक आहे. त्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी योग्य त्या सूचना द्या, असे पवार यांनी सांगितले.
सूचना पुरेशा नाहीत : लॉकडाऊनच्या अटी शिथील करून राज्यातील उद्योग सुरू करण्याकडे शासनाने भर दिला आहे. परंतु त्यासाठी काढलेल्या सूचना पुरेशा वाटत नाहीत. राज्य व राज्याबाहेरील कामगार गावी स्थलांतरित झाले असल्याने कारखाने सुरू होण्याच्या परिस्थितीत नाहीत. ते कसे परततील याचे नियोजन करा असे पवार म्हणाले.