चैन पडेना आम्हाला! 22 तासांच्या वैभवशाली मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 07:47 AM2017-09-06T07:47:52+5:302017-09-06T08:08:01+5:30
तब्बल 22 तासांच्या वैभवशाली मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आलं आहे
मुंबई, दि. 6 - तब्बल 22 तासांच्या वैभवशाली मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आलं आहे. भक्तिमय वातावरणात आणि 22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला भक्त भावपूर्ण निरोप देण्यात आला. मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास लालबागच्या राजाची मिरवणूक सुरु झाली होती. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी मुंबईकरांनी नेहमीप्रमाणे तुफान गर्दी केली होती. आपल्या लाडक्या गणपतीला निरोप देताना अनेकांच्या भावना अनावर झाल्या होत्या. बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर आगमन झालं होतं. यानंतर दोन तासांनी म्हणजेच आठ वाजण्याच्या सुमारास लालबागच्या राजाचं अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आलं.
गेले 10 दिवस मुक्काम केल्यानंतर गणपती बप्पांनी भक्तांचा निरोप घेतला आहे. पुढच्या वर्षी लवकर ये अशी साद घालत भक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप देत घरचा मार्ग धरला आहे. 22 तास चाललेल्या या मिरवणुकीत अनेकजण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सहभागी असतात. जोपर्यंत आपल्या लाडक्या गणपतीचं विसर्जन होत नाही, तोपर्यंत पाऊले पुढची वाट चालतच असतात. विसर्जन झाल्यानंतरच परतीच्या प्रवासाला भक्त सुरुवात करतात. विसर्जन सुरळीत पार पडल्याने पोलिसांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.
दगडूशेठ गणपतीची वैभवशाली मिरवणूक, सकाळी 7 वाजता झालं विसर्जन
बाबू गेनू, श्रीमंत भाऊ रंगारी आणि अखिल मंडई मंडळांच्या दिमाखदार मिरवणुकांनंतर पहाटे 2 वाजून 43 मिनिटांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात झाली आणि सकाळी 7 वाजेच्या सुमारास बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. पहाटे 2 वाजुन 40 मिनिटांनी दगडूशेठ गणपतीचे बेलबाग चौकात थाटात आगमन झाले आणि 2 वाजून 43 मिनिटांनी बाप्पाच्या मिरवणुकीला सुरूवात झाली. लाडक्या गणरायाचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दगडूशेठ गणपती दृष्टीपथात येताच भाविक जल्लोष करत होते. प्रभात बॅंड, दरबार बॅंड, स्वरूप वर्धिनीचे ढोलताशा आणि ध्वज पथकाच्या तालात गणराय विसर्जन मार्गावर आले. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते बेलबाग चौकात गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर शुक्ला यांनी स्वतः धुम्रवर्ण रथाचे सारथ्य केले. एकूणच वातावरण भक्तिमय आणि चैतन्यदायी असे होते. जय गणेशच्या जयघोषाने आसमंत व्यापून गेला होता.