मुंबई : घरोघरी गुरुवारी विराजमान झालेल्या गणपतींपैकी दीड दिवसाच्या गणरायांना ‘पुढच्या वर्षी लवकर या..’ अशी साद घालत शुक्रवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. विविध चौपाट्यांवर विसर्जनाकरिता विशेष खबरदारी घेण्यात आली होती. शुक्रवारी रात्री ९ वाजेपर्यंत ४३,३१९ घरगुती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यापैकी ९,८८३ बाप्पांचे विसर्जन कृत्रिम तलावांत करण्यात आले.गुरुवारी बाप्पाची स्थापना झाल्यानंतर सर्वत्र बाप्पांचा गजर घुमत होता. शुक्रवारी दुपारी उत्तरपूजेनंतर दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्याच्या तयारीला वेग आला. शाळांना सुट्टी असल्याने गणरायाला निरोप देण्यासाठी चिमुकल्यांचीही लगबग होती. गणरायाला मोदक, हरभऱ्याची मोकळी डाळ यांसह पेढ्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. निरोप देण्यापूर्वी ‘विघ्न दूर कर’ अशी प्रार्थना करीत दुपारनंतर विविध चौपाट्या आणि तलावांच्या ठिकाणी विसर्जनाकरिता भाविकांनी गर्दी केली होती. ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ अशी भावना व्यक्त करीत शहर-उपनगरातील भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.पोलीस, पालिकेचे विशेष नियोजनशहरात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शहर-उपनगरातील दादर, जुहू, गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.शुक्रवारी वाजत-गाजत आगमन झालेल्या बाप्पाला निरोप देताना गुलाल, फुलांच्या उधळणीसह ढोल-ताशांचा एकच गजर घुमत होता. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठीर् महापालिका आणि पोलीस यंत्रणेनेही विशेष काळजी घेतली. वातावरण हे बाप्पाच्या निरोपामुळे गणेशमय झाले होते.
चैन पडेना आम्हाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 3:53 AM