आॅक्टोबरपर्यंत मेट्रो प्रवाशांना दिलासा
By admin | Published: July 21, 2015 02:12 AM2015-07-21T02:12:48+5:302015-07-21T02:12:48+5:30
मेट्रोचे तिकीटदर ११0 रुपयापर्यंत वाढवण्यास दरनिश्चिती समितीने परवानगी दिल्यानंतर प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार असे दिसत होते
मुंबई : मेट्रोचे तिकीटदर ११0 रुपयापर्यंत वाढवण्यास दरनिश्चिती समितीने परवानगी दिल्यानंतर प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार असे दिसत होते. मात्र ३१ आॅक्टोबर २0१५ पर्यंत तिकिटांचे दर तेवढेच ठेवण्याचा निर्णय मुंबई मेट्रो प्रशासनाने घेतला असून, त्यामुळे लाखो प्रवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. परंतु त्यानंतर मेट्रोच्या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने भाडेवाढ करण्याचा विचार मेट्रो-१ कडून केला जाईल. तथापी मेट्रोसाठी अनुदानाबाबत विचार केला जात असून, राज्य शासन त्यासाठी कसा प्रतिसाद देते यावर भाडेवाढ अवलंबून असेल, असे मेट्रोने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोचे किमान तिकीट १0 रुपये, तर कमाल भाडे ४0 रुपये एवढे असून गेल्या वर्षीच्या ८ जुलैपासून हे भाडे आकारले जात आहे. यानंतर नवीन दरनिश्चितीवरून बराच वाद रिलायन्स आणि राज्य सरकारमध्ये झाल्यानंतर हा वाद उच्च न्यायालयात गेला. न्यायालयाने यावर केंद्राला दरनिश्चिती समिती स्थापन करण्याचा निर्णय दिला आणि त्यानुसार तीन सदस्यांची एक समिती ७ एप्रिल २0१५ रोजी स्थापन करण्यात आली. ही समिती उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ई. पद्मनाभन यांच्या अध्यक्षतेखाली नेमतानाच समितीत विधी विभागाचे माजी सचिव टी. के. विश्वनाथन आणि राज्याचे माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांचा समावेश करण्यात आला. या समितीकडून ८ जुलै रोजी दरनिश्चितीचा अहवाल सादर करतानाच त्यामध्ये मेट्रोचे तिकीट ११0 रुपयांपर्यंत वाढवण्यास परवानगी देण्यात आली. मात्र हे दर भरमसाठ असल्याने त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागणार असल्याचे समोर आले. याविरोधात एमएमआरडीएनेही सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. एकूणच होणारा विरोध पाहता मुंबई मेट्रोने ३१ आॅक्टोबरपर्यंत तिकीटदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला.