Join us

लॉकडाऊनमधून उभारणीसाठी आम्हालाही सवलत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 6:00 PM

खाजगी कोचिंग क्लासेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : आधी संचारबंदी आणि आता देशातील लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये शाळा व सगळ्याच प्रकारच्या शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस काही शाळा व क्लासेसकडून घेतले जात असून त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केला जात असला तरी खाजगी कोचिंग क्लासेसला मात्र याचा मोठा फटका बसत आहे. आम्ही सरकारला या परिस्थितीत पूर्ण सहकार्य करणार असलो तरी सरकारनेही आमचा विचार करीत जीएसटी सारख्या करांमध्ये सूट द्यावी आणि इतर सवलती द्याव्यात अशी मागणी महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन या खाजगी कोचिंग क्लासेसच्या संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून करण्यात आली आहे. 

संचारबंदीच्या काळात आठवडाभर आणि त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्व प्रकारच्या खाजगी शिकविण्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन बंद करण्यात आले आहेत. मात्र या दरम्यानच्या काळात आणि पुढील आणखी 15 दिवसांच्या काळात नवीन विद्यार्थी नोंदणी, शिक्षकांचे पगार, अभ्यासाचे साहित्य या खाजगी क्लासेसच्या कार्यवाहीवर मोठा परिणाम झाला असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कर्णावत यांनी दिली. सरकारने या पार्श्वभूमीवर खाजगी क्लास चालक आणि संस्थाना काही सवलती देऊ केल्यास या उद्योगाला पुन्हा उभे राहता येणे शक्य होईल म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केल्याची माहिती दिली. 

खाजगी क्लासेस ज्या ठिकाणी घेतले जातात त्या जागांवरील व्यवसायिक भाडे भरण्यात सवलत मिळावी, जीएसटी करता 5 टक्के पर्यंतची सूट मिळावी, खाजगी क्लासेसचे शिक्षक , कर्मचारी यांचे पगार करण्याकरिता काही सबसिडी सरकारकडून प्राप्त व्हावी, राष्ट्रीयकृत बँकांकडून काही मुद्रा लोन सारख्या  योजना खाजगी क्लासेससाठी मिळाव्यात, कर भरण्यामध्ये जूनपर्यंत सवलत मिळावी तसेच कॉपीराइट ऍक्टमध्ये 2020-21 साठी सवलत मिळावी अशा मागण्या असोसिएशन कडून करण्यात आल्या आहेत. 

खाजगी कोचिंग क्लासेस हा सुद्धा आपल्या समाजातील एक महत्त्वाचा उद्योग असून अनेक विद्यार्थी शिक्षक यांचा यात समावेश आहे. यावर परिणाम होऊन तोट्यात गेल्यास भविष्यात अनेकांवर उपासमार व बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळू शकते.