मुंबईतील विविध परिसरातून ३ पक्षी, ५ साप व ५ खारींची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:07 AM2021-05-21T04:07:09+5:302021-05-21T04:07:09+5:30
मुंबई : चक्रीवादळामुळे मुंबईतील विविध परिसरामध्ये झाडांची तसेच काही घरांची पडझड झाली. यामुळे प्राणी व पक्षी यांनादेखील याचा फटका ...
मुंबई : चक्रीवादळामुळे मुंबईतील विविध परिसरामध्ये झाडांची तसेच काही घरांची पडझड झाली. यामुळे प्राणी व पक्षी यांनादेखील याचा फटका सहन करावा लागला. अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) आणि प्लांट अँड अॅनिमल वेलफेअर सोसायटी, मुंबई(पॉज-मुंबई) च्या स्वयंसेवकांनी मुंबईतील विविध परिसरातून पक्षी, प्राणी व सापांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली आहे.
वादळाच्या भीतीने मालाड पश्चिम येथील एका घरात तीन व बोरिवली पश्चिम येथील एका घरात दोन खारी आल्या होत्या. या खारींची सुखरूपपणे सुटका करण्यात आली. यानंतर मीरा रोड मार्ग येथून एक पाणसाप, बोरिवली पश्चिम येथून एक घोणस व एक धामण, मालाड पश्चिम येथील मालवणी चर्च येथील एका घराच्या स्वयंपाकघरातून एक नाग, दहिसरच्या शिवाजी कॉम्प्लेक्स येथून एक पाणसाप, पूनम गार्डन येथून एक पाणसाप तर मुलुंडच्या वैशालीनगर येथून एक दयाळ पक्षी व बोरिवली पश्चिम येथून एक सनबर्ड अशा सर्व प्राणी व पक्ष्यांची सुखरूपपणे सुटका करून त्यांना जीवनदान दिले आहे.