भारत-चीन युद्धाची समीक्षा करणारा ब्रुक्स अहवाल जाहीर करा- डॉ. सुब्रमण्यम स्वामी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 01:56 AM2020-07-05T01:56:18+5:302020-07-05T06:44:05+5:30
चीनला भारताच्या सीमा मान्य कराव्याच लागतील. त्याशिवाय चीनकडे पर्याय नाही. ही वस्तुस्थिती आहे. भारताच्या सीमेला मान्य करेपर्यंत त्यांच्याविषयी संबंध चांगले राहणार नाही
मुंबई : भारत-चीन १९६२च्या युद्धाची समीक्षा करणारा हँडरसन ब्रुक्स अहवाल जाहीर व्हावा, ही संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची इच्छा होती. पण, त्यांच्या अचानक जाण्याने हे खाते सांभाळणाऱ्या अरुण जेटली यांनीही तो प्रकाशित केला नाही. मात्र, आता हा अहवाल जाहीर करण्यासाठी जनतेनेच मोदी सरकारवर दबाव आणावा, अशी भूमिका सुब्रमण्यम स्वामी यांनी स्वातंत्र्यवीर आॅनलाइन व्याख्यानमालेतील फेसबुक लाईव्हदरम्यान केली.
युद्धसमयी नेहरू सरकारची राजकीय परिपक्वता, सैनिकी सामर्थ्याकडे दुर्लक्ष, तसेच केलेल्या गंभीर चुका जर समजल्या तर नंतरच्या काळात त्याची पुनरावृत्ती टाळता येईल म्हणून तो जाहीर होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आॅनलाइन व्याख्यानमालेत हिंदुस्थान सीमावाद (१९६२ ते २०२०पर्यंत) या विषयावर ते बोलत होते. चीनच्या अॅपवर बंदी घालण्याचे साहस भारत सरकारने केले. हे स्वागतार्ह आहे. आता त्याचे अनुकरण इतर देश करू लागले आहेत. ही आनंदाची बाब आहे. यामुळे नक्कीच चीनला धडा शिकवता येईल. अशा माध्यमातून चीनचे आर्थिक नुकसान होऊन तो वठणीवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चीनला भारताच्या सीमा मान्य कराव्याच लागतील. त्याशिवाय चीनकडे पर्याय नाही. ही वस्तुस्थिती आहे. भारताच्या सीमेला मान्य करेपर्यंत त्यांच्याविषयी संबंध चांगले राहणार नाही, असे सरदार पटेल यांनी नेहरूंना पूर्वीच सांगितले होते. पण नेहरूंना ते मान्य नव्हते. यावरून त्यांच्यात मतभेद होते. चीनची सत्ता ज्यावेळी कम्युनिस्टांनी घेतली तेव्हापासून त्यांची नीती भारताच्या विरोधात राहिली आहे. विन्स्टन चर्चिलच्या विरोधामुळे भारताला संयुक्त राष्ट्र संघात स्थान मिळाले नव्हते. कारण १९५०पर्यंत भारत ब्रिटिशांच्या अंकित होता. जवाहरलाल नेहरूंनी चीनला ही जागा द्यावी, असे म्हटले होते. पण अमेरिकेने १९७२पर्यंत ही जागा रिकामी ठेवली होती, चीनला ब्रिटिशांनी ठरवलेली सीमा मान्य नव्हती. १९६१ साली नेहरूंनी सीमा सैल ठेवल्याचा फायदा चीनने घेतला आणि १९६२ साली आक्र मण केले.
नेहरूंचाही आत्मविश्वास ढळला. त्यांनी फेअरवेल आसामचा नारा दिला. तवांगपर्यंत चीन पोहोचल्यामुळे त्यांनी आशाच सोडून दिली. तिथल्या भारतीय जनतेने आक्र मक भूमिका घेतली. त्यामुळे चीन नरमला, असे ते म्हणाले. प्रत्येक ठिकाणी चीन कुरापत काढून भांडण करताना दिसतो. असे असले तरी भारतीय सैन्याने नेहमीच त्यांना कडवी झुंज दिली आहे. १९६२ची आज स्थिती राहिलेली नाही. भारत आता खूप प्रगतशील आहे. त्यांच्याशी लढा देणे तितके सोपे नाही, हे चीन ओळखून आहे.
‘भारत आता शक्तिशाली झाला आहे’
१९६२ची स्थिती आता राहिलेली नाही. भारत प्रगतशील झाला आहे. भारतीय सेनेने वेळोवेळी चीनबरोबर कडवा संघर्ष केला आहे, लढा दिला आहे. त्यामुळे हिंदुस्थानने चीनला घाबरण्याचे कारण नाही. चीनच्याही काही बाबतीत कमजोरी आहेत, त्याचा फायदा घेत भारताने चीनला जेरीस आणले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरू गोविंदसिंग यांच्या पराक्र मांचा आणि युद्धनीतीचा त्या त्यानुसार अवलंब केला पाहिजे, असे विचार स्वामी यांनी व्यक्त केले.