मुंंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या (आरएसएस) हिंदू धर्मवादी संघटनांनी देशाला पोखरले आहे. परिणामी, आता देशाला आरएसएसपासून मुक्त करण्याची गरज आहे. याकरिता सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे, असा सूर पुरोगामी संघटनांच्या नेत्यांनी लावला. टिळकनगर येथील आदर्श विद्यालयात शनिवारी जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या सभेपूर्वी दुपारी आयोजित चर्चासत्रात माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, गुजरातमधील सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.इरफान इंजिनीअर यांनी मते मांडली.बी. जी. कोळसे-पाटील यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शिवाय, आरएसएसवरही त्यांनी शरसंधान साधले. ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढावे लागत आहे. त्यांना अशा प्रकाराच्या सभा घ्याव्या लागत आहेत. हाच देशाचा अपमान आहे. मोदी सरकार दिशाहिन झाले आहे आणि जोपर्यंत आरएसएस आहे, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही. म्हणून देश आरएसएस मुक्त करणे गरजेचे आहे,’ अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली.इरफान इंजिनीअर म्हणाले, ‘भाजपा सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. आज हिंदूवादी संघटना जे बोलतील, तेच करण्याची जबरदस्ती केली जात आहे. धर्माविरोधी आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करण्याचे काम हे सरकार करत आहे ‘हम करे सो कायदा !’ असे म्हणत सरकार सर्वसामान्यांवर अन्याय करत आहे. सरकार दलितांकडे ‘व्होट बँक’ म्हणून पाहत असून, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मात्र काहीच करत नाही.’तिस्ता सेटलवाड यांनी थेट आरएसएसवर हल्ला चढविला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ‘फासीस्टवादी’ आहे. स्वत:ला ‘सांस्कृतिक संघ’ म्हणवून घेत, त्यांच्याकडून पैशांचे गैरव्यवहार होत आहेत. लोकांच्या गरजांकडे दुर्लक्ष करून देखाव्यापुरत्या सुधारणांसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. देशाला धर्माच्या नावाखाली विभागले जात आहे. या धर्मांध शक्तीनेच रोहितचा जीव घेतला. त्यामुळे त्याचे बलिदान आपण विसरता कामा नये, असे सेटलवाड म्हणाल्या. (प्रतिनिधी)कन्हैयाच्या सभेला पोलिसांचे सुरक्षा कवचटिळकनगर येथील आदर्श विद्यालयात शनिवारी पार पडलेल्या कन्हैयाच्या सभेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असली, तरी कन्हैयाची सभा शांततेत पार पडली. शनिवारी दुपारी मुंबईत दाखल झाल्यावर कन्हैयाने चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. त्यानंतर टिळक नगरच्या आदर्श विद्यालयात त्याची सभा पार पडली. या वेळी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.शिवाय, या सभेवेळी येथे साध्या वेशातील पोलीस त्याच्या समर्थकांवर लक्ष ठेऊन होते.सभेसाठी संरक्षण पथकाबरोबरच पोलीस उपायुक्त संग्रामसिंग, एसीपी अब्दुल रऊफ शेख, दोन वरिष्ठ निरीक्षकांसहीत स्थानिक पोलीस ठाण्यातील ४ पोलीस निरीक्षक, ७ सहायक पोलीस निरीक्षक, १२ पोलीस उपनिरीक्षकांसहीत पोलीस कर्मचारी वर्गांनी येथे हजेरी लावली होती. त्यात वाहतूक पोलीसही मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते
भारताला आरएसएसपासून मुक्त करा
By admin | Published: April 24, 2016 4:35 AM