मुंबई : कार चालवायला शिकण्याच्या प्रयत्नात सायकल चालवत असलेल्या दोन चिमुरड्यांना चिरडल्याचा आरोप असलेल्या एका दाम्पत्याची मुंबई सत्र न्यायालयाने सुटका केली. तसेच पोलिसांनी गांभीर्याने तपास केला नाही, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, रवींद्र जाधव नावाच्या व्यक्तीने ११ डिसेंबर २०१६ रोजी तक्रार नोंदवली. त्यानुसार, त्यांच्या घराबाहेर जोरात आवाज आला आणि तो आवाजाच्या दिशेने घटनास्थळी गेले. त्यांनी पाहिले की, एक लहान मूल सँट्रो कारखाली आले होते. तर एक लहान मूल जखमी अवस्थेत होते. आजूबाजूला असलेल्या लोकांच्या मदतीने व एका आरोपीबरोबर ते लहान मुलांना घेऊन जवळच्या रुग्णालयात गेले. मात्र, रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एक महिला सँट्रो चालवत होती आणि तिच्या गाडीची धडक मुलांच्या सायकलला लागली. महिला तिच्या पतीकडून कार चालविण्याचे धडे घेत होती, अशी माहिती जाधव यांना मिळाली.
कफ परेड पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आणि आरोपींना अटक करण्यात आली. त्यांची कार तपासणीसाठी आरटीओकडे पाठविण्यात आली. वाहनाची चाचणी झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर आरोपपत्र दाखल केले. आरोपींनी न्यायालयात आपण दोषी नसल्याचे म्हटले. आरोपींचे वकील विवेक चौहान यांनी युक्तिवाद केला की, आरोपीच कार चालवत होते, याचा कोणताही पुरावा नाही. ‘खरंतर, वाहन आणि आरोपी यांचाच संबंध सरकारी वकिलांनी सिद्ध केलेला नाही.
पुरावे तपासल्यानंतर सत्र न्यायालयाच्या न्या. उर्मिला जोशी-फाळके यांनी म्हटले की, महिलेने बेदरकारपणे व निष्काळजीपणे कार चालविली, असे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे, तर ती कार महिला चालवत होती आणि तिने ते वाहन निष्काळजीपणे चालविले, हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी वकिलांची आहे. संबंधित वाहन दोन्ही आरोपींच्या मालकीचे होते किंवा अपघाताच्यावेळी ते वाहन आरोपींच्या ताब्यात होते, हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी कागदपत्रेही जमवली नाहीत. पोलिसांनी तपास गांभीर्याने केला नाही, असे न्यायालयाने म्हटले.
न्यायालयाचे निरीक्षणपादचाऱ्यांची काळजी घेणे, हे वाहनचालकाचे कर्तव्य आहे. तर मग लहान मुलांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. दोन लहान मुलांना जीव गमवावा लागला. मात्र तपास अधिकाऱ्यांनी संबंधित वाहन कोणाच्या मालकीचे आहे, हे तपासायचीही तसदी घेतली नाही. आरोपींकडे संबंधित वाहनाचा ताबा कसा? हे ही तपास अधिकाऱ्यांनी तपासले नाही, असे निरीक्षण न्यायालयाने दोन्ही आरोपींची सुटका करताना नोंदविले.