दिव्यांग गायकांच्या 'तिमिरातूनी तेजाकडे' अलबमचे प्रकाशन
By संजय घावरे | Published: April 23, 2024 09:17 PM2024-04-23T21:17:58+5:302024-04-23T21:18:22+5:30
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
मुंबई - 'तिमिरातूनी तेजाकडे' या दिव्यांग गायकांनी गायलेल्या भारतातील पहिल्या संगीत अलबमचे प्रकाशन आणि प्रसारण सोहळा १ मे रोजी सायंकाळी ७:३० वाजता दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणार आहे. या सोहळ्यात अल्बममधील गायक गीते सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
१९८६ साली भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली 'स्वरकुल चॅरिटेबल ट्रस्ट' ही संस्था मागील ३८ वर्षांपासून सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेचे विश्वस्त व गायक, संगीतकार त्यागराज खाडिलकर हे अनेक वर्षे दृष्टिहीन व दिव्यांगांना भारतीय संगीत व गायनाचे विनामूल्य प्रशिक्षण देत आहेत. या विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट गायकांना व्यावसायिक स्तरावर संधी आणि रोजगार मिळावा म्हणून 'स्वरकुल' संस्थेच्या 'त्यागराज म्युझिक अकादमी'ने या संगीत अलबमची निर्मिती केली आहे. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांतील कवींनी 'तिमिरातूनी तेजाकडे' अल्बमसाठी गीतलेखन केले असून, संगीतकार त्यागराज खाडिलकर यांनी संगीत दिले आहे. रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून दिव्यांग कलाकारांच्या आयुष्यातील एक दिवस प्रकाशमान करावा आणि त्यांच्या निरागस मनाला कायमस्वरूपी आनंदाचा ठेवा द्यावा असे आवाहन त्यागराज यांनी केले आहे.