'केंद्रातील सत्तासहभाग सोडा, मग पाहू''; राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेसमोर अट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 08:13 PM2019-11-10T20:13:55+5:302019-11-10T20:18:14+5:30
भाजपाच्या या निर्णयानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे.
मुंबई: भाजपा सत्तास्थापन करणार नाही असं भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या या निर्णयानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यातच भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची देखील खलबतं सुरु झाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत आतापर्यत कोणताही निर्णय झाला नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यपालांचे आता शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण; भाजपाचा नकार
नवाब मलिक म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्याचप्रमाणे शिवसेनेने आधी एनडीएमधून बाहेर पडावं व केंद्रामधील अवजड खात्याचा राजीनामा द्यावा अशी अट देखील घालण्यात आली आहे. त्यानंतर सरकार स्थापन्यासाठीचा आम्हाला प्रस्ताव द्यावा, त्यानंतरच निर्णय घेतला जाईल असं मत नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस वेट अँड वॉचच्या भुमिकेत राहणार असल्याचे दिसून येत आहे.
Nawab Malik, NCP: We have called a meeting of our MLAs on Nov 12. If Shiv Sena wants our support,they will have to declare that they have no relation with BJP&they should pull out from National Democratic Alliance (NDA). All their ministers will have to resign from Union Cabinet. https://t.co/iABYpebRTU
— ANI (@ANI) November 10, 2019
निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरल्याने राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. मात्र भाजपाकडे सत्तास्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा नसल्याने सरकार स्थापन करण्यास त्यांनी नकार दिला आहे. यामुळे आता राज्यपाल 56 जागा जिंकून निवडणुकीत दूसरा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला राज्यपाल सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.