गौरी गणपती उत्सवासाठी चाकरमान्यांना विशेष रेल्वे गाड्या सोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 06:52 PM2020-07-31T18:52:08+5:302020-07-31T18:52:32+5:30
कोकणवासीयांची मागणी : एसटीची सेवा लवकर सुरु करावी
मुंबई : कोकणात जाण्यासाठी मुंबईतील चाकरमान्यांना कोकण रेल्वे मार्गावरून विशेष गाड्या सोडण्याची मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यासाठी सुमारे ७० मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या पाठींब्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. गणेश चतुर्थी पूर्वी १४ दिवसांचे विलगीकरण करावे लागणार आहे. त्यामुळे ७ ऑगस्टपूर्वी गावाला पोहोचणे आवश्यक आहे. गौरी-गणपती सणास कोकणात जाणाऱ्या गणेशभक्त प्रवाशांची प्रवास व्यवस्था आणि इ-पास बाबत लवकर योग्य निर्णय घ्यावा. एसटीची सेवा लवकर सुरु करावी, अशीही मागणी गणेशभक्तांनी केली.
गौरी गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी सरकारकडून कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे कोकणात जायचे कसे असा प्रश्न कोकणवासियांना पडला आहे. कोकणातील मानाच्या गणपती उत्सवावर सध्या कोरोनाचे संकट आहे. गणपती उत्सवाच्या दरम्यान कोरोनाचे नियम पाळण्यात यावे, यासाठी राज्य सरकार नियमावली तयार करत आहे. मात्र, सरकारकडून अद्याप ठोस असा कोणताही निर्णय झाला नसल्य़ाने कोकणातील चाकरमान्यांना आपल्या घरी गणपती जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर मुंबई-पुणे-सावंतवाडी या दरम्यान विशेष रेल्वे सोडण्याची मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघांने केली आहे. त्यासाठी या संघाने केलेल्या मागणीसाठी पाठिंबा मोहिम राबवली असून, सुमारे ७० गणेश मंडळ आणि सामाजिक संस्थांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे. कोकणातील स्थानिक ग्रामपंचायतीने गाव ठराव करून गणेश चतुर्थी पूर्वी १४ दिवसांचे विलगीकरण करावे लागणार आहे. त्यामुळे ७ ऑगस्टपूर्वी गावाला पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे विशेष रेल्वे आणि एसटी सेवा लवकर सोडण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी गणेशभक्तांनी केली आहे.