लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रिलायन्स ब्रँड्सच्या सीईओचा फोटो डीपीवर ठेवून सीनियर व्हाइस प्रेसिडेंटची फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी सतर्कता दाखविल्यामुळे फसवणूक करणारा अपयशी ठरला. या प्रकरणी त्यांनी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीकेसीमध्ये जिओ वर्ल्ड ड्राइव्ह या ठिकाणी मनीष मित्तल (४७) हे टेक्नॉलॉजी रिलायन्स ब्रँड्सचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत, तर दर्शन मेहता (६५) हे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत. २ मे रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास त्यांच्या मोबाइलवर एका व्हॉट्सॲप क्रमांकावरून मी दर्शन मेहता असून, तुम्हाला वेळ आहे का, अशी विचारणा केली. या क्रमांकावर मेहता यांचा डीपी असल्याने, मित्तल यांनी त्याच्यावर विश्वास ठेवत काय काम आहे, असे विचारले. तेव्हा ते मीटिंगमध्ये व्यस्त असून, त्यांच्या एका मित्राला गिफ्ट कार्ड पाठवायचे आहे, जे पेटीएममधून खरेदी करा, असे मित्तल यांना मेसेजवरून सांगण्यात आले. इतकेच नव्हे, तर ते पैसे नंतर देतो, असेही संदेशात नमूद करण्यात आले होते.
मात्र, तो मोबाइल क्रमांक हा मेहता यांचा वापरता क्रमांक नसल्याने, मित्तल यांना संशय आला आणि त्यांनी मेसेज पाठविणाऱ्याला त्याची ओळख विचारली. त्यावर पुन्हा तो मीटिंगमध्ये असल्याचे म्हणाला आणि संशय बळावल्याने मित्तल यांनी कोणतेही गिफ्ट कार्ड पाठविले नाही. त्यानंतर, त्यांनी मेहताना संपर्क करून, संबंधित मेसेजबाबत विचारले, तेव्हा त्यांना असा कोणताही मेसेज पाठविला नसल्याचे सांगितले. त्यानुसार, मेहता यांचे नाव आणि फोटोचा भामट्यांकडून चुकीचा वापर होत असल्याचे उघड झाले आणि त्यांनी या प्रकरणी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.