मुंबई - केरळच्या पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतनिधी देण्यात येत आहे. खेळाडूंपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच केरळसाठी मदत उभारण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारनेही 500 कोटींची मदत जाहीर केली असून बहुतांश राज्य सरकारनेही रोख रक्कम मदत म्हणून दिली आहे. त्यातच, आता रिलायन्स फाऊंडेशनही केरळच्या मदतीसाठी पुढे आले आहे. रिलायन्स फाऊंडेशनने केरळ मुख्यमंत्री आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडे 21 कोटी रुपयांचा चेक दिला आहे.
रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून अंबानी कुटुंबाकडून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली जाते. रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख निता अंबानी या कामी जातीने लक्ष घालतात. निता अंबांनी यांनी केरळच्या पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री सहायता केंद्राकडे 21 कोटी रुपयांचा चेक पाठविण्यात आला आहे. तसेच रिलायन्स रिलेटच्या माध्यमातून 50 कोटी रुपयांचे साधनसामुग्री केरळला पाठविण्यात आली आहे. 14 ऑगस्टपासूनचे रिलायन्स फाऊंडेशनचे कर्मचारी केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. रिलायन्सकडून केरळमधील सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यात रिलायन्सचे पथक मदतकार्य करत आहेत.
रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून जवळपास 160 बचाव कॅम्पमध्ये जेवण, ग्लुकोज आणि सॅनेटरी नॅपकीनचा पुरवठा करण्यात येत आहे. या बचाव कॅम्पमध्ये जवळपास 50 हजार लोकांना आश्रय देण्यात आला आहे. साधारणत: 7.5 लाख कपडे, 1.5 लाख पादत्राणे आणि कडधान्य केरळला पाठिवण्यात आले आहे. रिलायन्स रिटेलकडून पोहोचविण्यात येणारी ही मदत अंदाजे 50 कोटी रुपयांची असल्याची समजते. दरम्यान, यांसह औषधोपचाराचे साहित्य आणि पुनर्वसनासाठीही रिलायन्सकडून मदत करण्यात येणार आहे.