रिलायन्स फाउंडेशन देणार ५,१०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांसाठी ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 06:10 AM2024-08-16T06:10:00+5:302024-08-16T06:10:01+5:30
पदवी अभ्यासक्रमात प्रत्येक विषयासाठी शिष्यवृत्ती दिली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रिलायन्स फाउंडेशनने २०२४-२५ या वर्षासाठी तब्बल ५ हजार १०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. देशभरातील ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश हवा आहे, ते यासाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी रिलायन्स फाउंडेशनच्या अधिकृत संकेस्थळावर भेट देता येणार आहे. दरम्यान अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर २०२४ आहे.
पदवी अभ्यासक्रमात प्रत्येक विषयासाठी शिष्यवृत्ती दिली जात आहे. प्रत्येक पदवीधर विद्यार्थ्याला २ लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. जे विद्यार्थी पदवीपूर्व किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेणार आहेत, ते या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कोणत्याही विषयासाठी अर्ज करू शकतात. पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि जीवन विज्ञान विषयांसाठी शिष्यवृत्ती गुणवत्तेच्या आधारावर दिली जाईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६ लाखांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.