रिलायन्स इंडस्ट्रीज एमएमआरडीएची थकबाकीदार
By admin | Published: July 21, 2015 01:49 AM2015-07-21T01:49:43+5:302015-07-21T01:49:43+5:30
बीकेसीमधील जमिनीचा ३४ महिन्यांपासून अतिरिक्त प्रीमियम न भरल्यामुळे रिलायंस इंडस्ट्रीज एमएमआरडीएची थकबाकीदार ठरली आहे. अतिरिक्त प्रीमियम
मुंबई : बीकेसीमधील जमिनीचा ३४ महिन्यांपासून अतिरिक्त प्रीमियम न भरल्यामुळे रिलायंस इंडस्ट्रीज एमएमआरडीएची थकबाकीदार ठरली आहे. अतिरिक्त प्रीमियम न भरणाऱ्या कंपनीकडून व्याजासहित रक्कम वसूल करण्याची मागणी करण्यात येत आहे.एमएमआरडीए प्रशासनाने बीकेसीमधील जी ब्लॉकमधील सी-६६ हा भूखंड मे. रिलायन्स इंडस्ट्रीज प्रा.लि.ला लीजवर दिला आहे. एमएमआरडीएने कंपनीला २00८मध्ये जमिनीचे वितरण केले आहे. या जमिनीची रक्कम ९१८ कोटी ३ लाख ५ हजार ५५0 रुपये आहे. या जमिनीवरील १0१८३.१८ चौरस मीटर जमिनीपैकी २0३६६ चौरस मीटर क्षेत्र पब्लिक कार पार्किंग आणि ३0५५0 चौरस मीटर कमर्शियल कॉम्प्लेक्ससाठी वापरण्याची अट घालण्यात आली आहे. त्यानुसार रिलायन्स कंपनीने या जमिनीवर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारला आहे. तसेच इतर कामे सुरू आहेत.
परंतु लीज डीडपासून या जमिनीवरील बांधकाम ४ वर्षांपर्यंत पूर्ण करण्याची मुदत असताना कंपनीने या अटीचे उल्लंघन केले आहे. एमएमआरडीए आयुक्तांनी कंपनीकडून ४0 टक्के अतिरिक्त प्रीमियम आकारत २८ मेपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदतवाढ दिली होती.
या मुदतवाढीची सुमारे ३४१ कोटी रुक्कम मे. रिलायन्स इंडस्ट्रीज प्रा.लि.कडून बाकी असल्याचे, एमएमआरडीएने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीमध्ये स्पष्ट केले आहे.