खालापूर : खालापूर, पेण आणि कर्जत या तालुक्यातून रिलायन्स कंपनीची इथेन गॅस वाहून नेणारी पाइपलाइन जाणार असल्याने त्यासाठीची पर्यावरण जनसुनावणी चालू होती. मात्र सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी आक्षेप घेत सुनावणी रद्द करण्याची मागणी करीत सुनावणीवर बहिष्कार घातला. बाधित तालुका स्तरावर सुनावणी घेण्याची मागणी कायम लावून धरली. नागोठणे ते दहेज या मार्गावरून रिलायन्स कंपनीची इथेन गॅस पाइपलाइन जाणार असल्याने पेण, खालापूर आणि कर्जत या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून हा मार्ग आहे. याबाबत प्रदूषण विभागाने पर्यावरण जन सुनावणी ४ एप्रिलला सकाळी ११ वा. धामणी येथील विश्वनिकेतन महाविद्यालयात करण्यात आले होते. व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी सतीश बागल, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी खेडकर, शशांक वाघमारेंसह इतर अधिकारीवर्ग उपस्थित होते. सुनावणीला सुरुवात होताच सामाजिक कार्यकर्ते अरु ण शिवकर, मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष अभिषेक दर्गे यांनी आजची सुनावणी रद्द करण्याची मागणी लावून धरली. सुनावणीच्या दिवशी हनुमान जयंती उत्सव असल्याने शेतकऱ्यांना येणे शक्य नसल्याचे सांगून बाधित तालुका स्तरावर स्वतंत्र जन सुनावणी शासकीय जागेमध्येच घेण्यात येऊन शेतकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा प्रयत्न असल्याचे उपस्थितांनी एकमुखाने जनसुनावणी रद्द करून तालुका विभागनिहाय घेण्याची मागणी केली. प्रचंड गोंधळाच्या वातावरणातच शेतकरीवर्गाने सभागृहातून उठून निषेध नोंदवित सुनावणीवर बहिष्कार घातला. यावेळी कर्जत नगराध्यक्ष राजेश लाड, मनसेचे अभिषेक दर्गे, नारंगी सरपंच उद्धव देशमुख, दिगंबर सालेकर आदींसह बाधित गावातील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
रिलायन्स जनसुनावणी उधळली
By admin | Published: April 05, 2015 10:36 PM