Join us

रिलायन्स रिटेल निर्माण करणार 10 लाख रोजगार; वार्षिक सभेमध्ये मुकेश अंबानी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 8:06 AM

वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मुकेश अंबानी यांचे प्रतिपादन

मुंबई :  रिलायन्स रिटेल तीन वर्षांत १० लाख नवीन रोजगार निर्माण करेल. यासह लाखो लोकांना अप्रत्यक्ष रोजीरोटीच्या संधीही निर्माण केल्या जातील, असे प्रतिपादन रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी ही घोषणा केली. 

रिलायन्स रिटेलने कोविड  महामारीदरम्यान चांगली कामगिरी सुरू ठेवली. कंपनीने आपल्या स्टोअरची संख्या १५०० ने वाढवितानाच साथीच्या आजारात ६५  हजार नवीन नोकऱ्याही दिल्या आहेत. दोन लाख व्यक्ती काम करीत असलेले  रिलायन्स रिटेल हे देशातील सर्वात मोठ्या रोजगार दात्यांपैकी एक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कंपनीची देशातील सात हजाराहून अधिक शहरांमध्ये १२,७११ स्टोअर असल्याचे सांगून मुकेश अंबानी म्हणाले की, “आमच्या वस्त्र व्यवसायाने दररोज सुमारे पाच लाख युनिट आणि वर्षभरात १८ कोटी कपड्यांची विक्री केली आहे. हे एकाच वेळी ब्रिटन, जर्मनी आणि स्पेनच्या संपूर्ण लोकसंख्येस पोशाख करण्यासारखे आहे.  आम्ही जागतिक दर्जाच्या पहिल्या १० किरकोळ विक्रेत्यांपैकी एक आहोत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म जिओमार्टने २०० शहरांमध्येही व्यवसाय पसरविला असल्याचेही त्यांनी सांगितले.

गणेश चतुर्थीला लाॅंच हाेणार ‘जिओफाेन नेक्स्ट’

मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ आणि गूगलच्या भागीदारीतून जिओफोन-नेक्स्ट हा नवीन स्मार्टफोन जाहीर केला. नवीन स्मार्टफोन सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा आहे तसेच अत्यंत किफायतशीर असेल आणि १० सप्टेंबरपासून अर्थात गणेश चतुर्थीपासून बाजारात उपलब्ध होईल. देशात ५जी सेवेसाठी कंपनी सज्ज असून देशाला २जी मुक्त आणि ५जी युक्त करण्याच्या दिशेने कंपनीचे काम सुरू असल्याचे अंबानी यांनी सांगितले.

‘ग्रीन एनर्जी’ प्रकल्पाची घाेषणा

मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीच्या ‘ग्रीन एनर्जी’ प्रकल्पाची घाेषणा केली. त्यासाठी नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रात ६० हजार काेटी रुपयांची गुंतणूक करणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले. त्यासाठी कंपनी फाेटाेव्हाेल्टाईक गिगा फॅक्टरी, अद्यावात एनर्जी स्टाेरेज गिगा फॅक्टरी, फ्युएल सेल गिगा फॅक्टरी आणि इलेक्ट्राेलायझर गिगा फॅक्टरी अशा चार काॅम्प्लेक्स विकसित करण्यात येणार आहेत. 

रिलायन्स अरामको एकत्र

साैदी अरेबियामधील माेठी तेल कंपनी ‘अरामकाे’साेबत १५ अब्ज डाॅलर्स एवढ्या भागीदारीची घाेषणा  अंबानी यांनी केली. अरामकाेचे अध्यक्ष यासीर अल रुमय्या यांना कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून संचालक मंडळात स्थान देण्यात आले. रिलायन्स २० टक्के भागभांडवल अरामकाेला विकणार आहे.  

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सनोकरीजिओ