मुंबई : रिलायन्सने मुंबईत वीजच्या दरात ४० टक्के वाढ केली आहे. ही वाढ टाटाच्या वीजेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे याविरुध्द एमईआरसीकडे दाद मागितली जाईल, असे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.अर्थसंकल्पातील मागण्यांवर बोलताना ते म्हणाले, महाजनकोस छत्तीसगड मधील गारेवालमार येथील कोळसा खाण केंद्र सरकारने राज्य सरकारला देऊ केली आहे. त्यात ६५३ दशलक्ष टन एवढा कोळसा आहे. त्यामुळे राज्यातील कोळश्यावर चालणारे प्रकल्प पुढची २० वर्षे चालू शकतील असे सांगून बावनकुळे म्हणाले, या खाणीमुळे राज्यातील वीजेचे चित्रच बदलून जाणार आहे. ते पुढे म्हणाले, वीज कंपन्यातील देखभाल व दुरु स्तीची कामे सुशिक्षीत बेरोजगार अभियंत्याकडून लॉटरी पद्धतीने करण्याबाबत तसेच जिल्हा व तालुकास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समिती स्थापन गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेद्वारे जवळ जवळ ५० हजार सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई ११०० मेगावॅट वीज बाहेरुन घेते. ८०० मेगावॅट महावितरणकडून तर ३०० टाटाकडून घेतली जाते. यासाठीचे वायर नेटवर्क म्हणावे तसे स्ट्राँग नाही त्यासाठी ५५० कोटींचा खर्च करुन वेटवर्क उभे करण्यास मान्यता दिल्याचेही ते म्हणाले.सन २०१५-१६ या वर्षात ७ हजार ५४० कृषी सोलर पंप लावण्यात येणार आहेत. यासाठी ४४५ कोटी रु पयांची तरतुद अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. शेतकऱ्यांच्या नावाने घेण्यात येणारे २६७ कोटींचा खर्च महावितरण भरणार असून शेतकऱ्यांना फक्त ५ टक्के रक्कम खर्च करावी लागणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
रिलायन्सच्या वीज दरवाढीला आव्हान देणार
By admin | Published: March 27, 2015 1:23 AM