राज्यातील बारावीच्या १४ लाख विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:06 AM2021-06-04T04:06:15+5:302021-06-04T04:06:15+5:30

मुंबई : मागील १४ महिने बारावीचा अभ्यास करणारे आणि कोरोना परिस्थितीत परीक्षा कशा होणार, या तणावाखाली असणाऱ्या राज्य मंडळाच्या ...

Relief for 14 lakh 12th standard students in the state | राज्यातील बारावीच्या १४ लाख विद्यार्थ्यांना दिलासा

राज्यातील बारावीच्या १४ लाख विद्यार्थ्यांना दिलासा

Next

मुंबई : मागील १४ महिने बारावीचा अभ्यास करणारे आणि कोरोना परिस्थितीत परीक्षा कशा होणार, या तणावाखाली असणाऱ्या राज्य मंडळाच्या १४ लाख विद्यार्थ्यांना अखेर परीक्षा रद्द झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सीबीएसई आणि राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या असल्याने अंतिम निकाल हा अंतर्गत गुणांच्या आधारे जाहीर होणार हे स्पष्ट आहे. पण, त्याचे नेमके निकष काय असतील हे अजून स्पष्ट नसल्याने पालक, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.

बारावीच्या ऑफलाइन परीक्षा होणार नाहीत त्यामुळे आरोग्याच्या सुरक्षिततेच्या मोठ्या तणावातून आम्ही मुक्त झालो आहोत. मात्र आता पुढील प्रवेश कसे होणार, आम्हालासुद्धा अकरावीच्या विद्यर्थ्यांप्रमाणे सीईटी द्यावी लागेल का, ती कशाच्या आधारावर असेल, ऐच्छिक असेल का, विशेष म्हणजे ती आम्हाला ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्याची असेल की ज्या विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यापीठाची असेल याबाबतीत स्पष्टता येणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया बारावी वाणिज्य शाखेच्या आणि गोखले महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या प्रेरणा कळंबे हिने दिली.

अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शौमिकने बारावी परीक्षा रद्द झाल्याचा आनंद असल्याचे म्हटले. मात्र परीक्षाच होणार नसल्याने फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांत चांगले गुण मिळविण्याची संधी विद्यार्थ्यांकडे नाही आणि अंतर्गत मूल्यमापन कोणत्या निकषांवर होणार हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे आम्हाला थोडी चिंता वाटत असल्याचे मत व्यक्त केले आहे. जेव्हा आम्ही अकरावी आणि बारावीच्या वर्षात अंतर्गत परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापनासाठी गृहपाठ, व्यवसाय दिले तेव्हा आम्हाला कल्पना नव्हती की या परीक्षांचे गुण थेट आमच्या पदवी प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. या कारणास्तव अंतर्गत मूल्यमापनाचे निकष काय असणार याबद्दल उत्सुकता असल्याचे मत कला शाखेच्या महेश निरंजनेने व्यक्त केले.

पदवी प्रवेशासाठी राज्यातील विद्यापीठांत आणि नामांकित महाविद्यालयांत सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य मंडळ विद्यार्थ्यांमध्ये विशेष चढाओढ असते. त्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द केल्याने पुढील पदवीचे प्रथम वर्ष प्रवेशासाठी गुण समानीकरण कसे करणार ? आणि प्रवेशाची प्रक्रिया कशी राबविणार याचा तिढा शिक्षण विभागाने लवकर सोडवावा असे मत अभिलाषा हुंजेकर हिने व्यक्त केले आहे.

कोट

बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या हा निर्णय दिलासादायक असला तरी प्रवेशाचा प्रश्न अजून सुटला नाही. शिक्षण विभागाने प्रत्येक विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि यंदाच्या वर्षाची मेहनत यांची सांगड घातली जाईल असा फॉर्म्युला अंतर्गत मूल्यमापनासाठी ठरवून त्यावरच पदवी प्रवेशाची प्रक्रिया राबवावी. सीईटी परीक्षांचा विविध शाखा आणि विविध अभ्यासक्रमासाठीचा घाट घातल्यास गुंता वाढणार आहे.

साक्षी राणे, बारावी वाणिज्य विद्यार्थिनी , विवा महाविद्यालय

Web Title: Relief for 14 lakh 12th standard students in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.