५०० मूळ आदिवासींना दिलासा
By Admin | Published: May 7, 2017 06:34 AM2017-05-07T06:34:27+5:302017-05-07T06:34:27+5:30
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राज्याचे वनखाते अस्तित्वात येण्यापूर्वी गेली अनेक वर्षे राहत असलेल्या मूळ आदिवासींची
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राज्याचे वनखाते अस्तित्वात येण्यापूर्वी गेली अनेक वर्षे राहत असलेल्या मूळ आदिवासींची घरे वन विभागाकडून नुकतीच तोडण्यात आली होती. यासंदर्भात शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. यावेळी वनविभागाने पुन्हा कारवाई करणार नाही, असे आश्वासन दिल्याचे सुर्वे यांनी सांगितले. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ५०० मूळ आदिवासींना दिलासा मिळाला आहे.
आदिवासींच्या घरांवर वनविभागाने केलेल्या तोडक कारवाईला विरोध करत आमदार प्रकाश सुर्वे यांनी घटनास्थळाची पाहणी केली; शिवाय पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि वनविभागाचे सचिव विकास खर्गे यांच्याशी संपर्क साधत कारवाई थांबविण्यात यावी, असे म्हणणे मांडले. वनविभागाचे अधिकारी आणि येथील सुमारे ४०० ते ५०० रहिवाशांसोबत सुर्वे यांनी संयुक्त बैठक घेतली. येथे अनेक वर्षे राहत असलेल्या आदिवासी बांधवांचे १८ महिन्यांत पुनर्वसन करा, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना आजवर त्यांचे पुनर्वसन झाले नाही. परिणामी, पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांच्या घरांवर कारवाई करू नये, अशी भूमिका सुर्वे यांनी घेतली. शिवाय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याबरोबर बैठक घेत कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासनही या बैठकीत दिले.
दरम्यान, या बैठकीत वनविभागाने पुन्हा कारवाई करणार नाही, असे आश्वासन दिल्याचे सुर्वे यांनी सांगितले. बैठकीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक अहमद अन्वर, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत मर्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश रावराणे आदी उपस्थित होते.