मुंबई : धर्मादाय आयुक्तांनी केलेल्या स्टिंग आॅपरेशननंतर शहर-उपनगरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी झोपडपट्टी, रस्त्यावरील गरीब रुग्णांना उपचार देण्याचे मान्य केले. त्यानंतर धर्मादाय आयुक्तालयाची गरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष मोहीम शनिवारी दिवसभर पार पडली. या मोहिमेदरम्यान, शहर - उपनगरातील झोपडपट्ट्या, सिग्नल अशा सर्व ठिकाणच्या तब्बल ११ हजार नागरिकांवर उपचार करण्यात आले, तर ३० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती आयुक्तालयाने दिली.मुंबई शहर-उपनगरातील जवळपास ७६ धर्मादाय रुग्णालयांनी या मोहिमेत सहभाग दर्शविला. यात एल.एच. हिरानंदानी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी, पी.डी. हिंदुजा, भाटिया, एस.एल. रहेजा, जसलोक, सैफी यांसारख्या पंचतारांकित रुग्णालयांचा समावेश होता. याखेरीज दादर येथील शुश्रूषा व गोदरेज ही खासगी रुग्णालये स्वेच्छेने यात सहभागी झाली होती. या मोहिमेत गरीब कुटुंबातील सर्व सदस्यांच्या प्राथमिक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. शिवाय, ज्यांना आवश्यक आहे त्यांना औषधोपचार देण्यात आले. त्यातील ज्यांची प्रकृती गंभीर आहे, अशा ३० जणांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती धर्मादाय आयुक्तालयाचे आयुक्त शिवकुमार डिग्गे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मोहिमेला प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अनेक जण उपचारांचा खर्च परवडत नसल्याने आजारपण अंगावर काढत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या मोहिमेच्या माध्यमातून अनेकांना लाभ मिळाल्याचे डिग्गे यांनी सांगितले.लवकरच राज्यव्यापी मोहीम : गरीब रुग्णांना उपचार मिळण्यासाठी घेण्यात आलेल्या मोहिमेचा हा केवळ पहिला टप्पा होता. यानंतर लवकरच अशाच प्रकारे राज्यव्यापी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेत राज्यभरातील जवळपास ४३७ धर्मादाय रुग्णालयांचाही सहभाग असेल, असे आयुक्त डिग्गे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, गरीब रुग्णांनी धर्मादाय रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही डिग्गे यांनी सांगितले. या रुग्णांना वार्षिक उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या साहाय्याने या रुग्णालयांत उपचार देण्यात यावेत, रुग्णालयांनी उपचारांसाठी नकार दिल्यास त्वरित धर्मादाय आयुक्तालय कार्यालयात तक्रार करावी, असे आवाहन डिग्गे यांनी केले.
गरीब रुग्णांना धर्मादाय आयुक्तांचा दिलासा; ११ हजार रुग्णांवर उपचार, तर ३० व्यक्तींना केले रुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 4:38 AM