कोरोना रुग्णांना दिलासा : सोमवार दुपारपर्यंत ऑक्सिजनची समस्या दूर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:06 AM2021-04-19T04:06:45+5:302021-04-19T04:06:45+5:30

आयुक्त इक्बालसिंह चहल यांचे परिस्थितीवर लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना रुग्णांना ऑक्सिजन कमी पडत असल्याने त्यांना एका ...

Relief for Corona patients: Oxygen problem will go away by Monday afternoon | कोरोना रुग्णांना दिलासा : सोमवार दुपारपर्यंत ऑक्सिजनची समस्या दूर होणार

कोरोना रुग्णांना दिलासा : सोमवार दुपारपर्यंत ऑक्सिजनची समस्या दूर होणार

googlenewsNext

आयुक्त इक्बालसिंह चहल यांचे परिस्थितीवर लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना रुग्णांना ऑक्सिजन कमी पडत असल्याने त्यांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात शनिवार गेला. त्यानंतर रविवारी मात्र मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात अशा काहीच अडचणी आल्या नाहीत. रविवारी पुरेसे ऑक्सिजन होते. खासगी रुग्णालयांमध्ये एखाद् दुसरे प्रकरण वगळता असे काही निदर्शनास आले नाही. आता मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनीही ऑक्सिजनबाबत अडचण नसल्याचे म्हटले असून, ऑक्सिजन येण्यास सुरुवात झाली आहे. पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

सोमवार दुपारपर्यंत ऑक्सिजनची अडचण दूर होईल. रिकामी झालेली सिस्टीम भरून ठेवली जात आहे, असेही काकाणी यांनी नमूद केले. परिणामी ऑक्सिजनबाबत मुंबई महापालिकेने कोरोना रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना आणि मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाल्यामुळे महापालिकेच्या सहा रुग्णालयांमधील १६८ रुग्णांना इतर कोविड रुग्णालय व कोविड केंद्रांमध्ये शनिवारी स्थलांतरित करण्यात आले. खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा कमी पडत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत. आता पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्येही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. भगवती रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर कमी पडल्यानंतर शुक्रवारी २५ रुग्णांना अन्य रुग्णालयात हलविले होते. त्यानंतर शनिवारी आणखी सहा ठिकाणी ही समस्या निर्माण झाली होती. ऑक्सिजन पुरवठा कमी असल्याने पालिकेच्या वांद्रे येथील भाभा, कुर्ला भाभा, बोरिवलीतील भगवती, गोवंडी येथील शताब्दी, मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल, जोगेश्वरीतील ट्रॉमा या सहा रुग्णालयांतून एकूण १६८ रुग्णांना इतर रुग्णालये अथवा समर्पित कोविड आरोग्य केंद्रात शनिवारी स्थलांतरित करण्यात आले.

दरम्यान, मुंबईला ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी पालिका प्रशासनाचा पाठपुरावा सुरू आहे. कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढली असून त्यामुळे रुग्णांना प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठा करण्याची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. प्राणवायू पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. २४ प्रशासकीय विभागात प्राणवायू पुरवठा सुरळीत राखता यावा म्हणून, अन्न व औषध प्रशासन तसेच प्राणवायू उत्पादक आणि संबंधित सहायक आयुक्तांसाेबत समन्वय साधण्यासाठी महापालिकेने सहा समन्वय अधिकारी नियुक्त केले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तसेच समर्पित कोविड आरोग्य केंद्रामध्ये प्राणवायू असलेले बेड्स् उपलब्ध आहेत.

महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासह सर्व अतिरिक्त आयुक्त परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सक्रियपणे यंत्रणेला मार्गदर्शन करत आहेत.

---------------------

* आरोग्य विभाग रात्रंदिवस कार्यरत

रुग्ण व्यवस्थापन करण्यासाठी सर्व सहायक आयुक्त आणि त्यांचे सहकारी, संपूर्ण आरोग्य विभाग रात्रंदिवस कार्यरत आहेत. प्राणवायू उपलब्धतेसह कोविडबाधितांची आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येत आहे. महापालिका प्रशासन आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

* ऑक्सिजनची चणचण नाही

ऑक्सिजनची चणचण लक्षात घेता पालिकेने दररोज ५० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होईल यासाठी एका कंपनीबरोबर करार केला. परिणामी पालिकेला आता दररोज २८५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होईल. आणि मुंबईत ऑक्सिजनची चणचण भासणार नाही.

* रुग्णांना सुरक्षितपणे हलवले

महानगरपालिकेच्या सहा रुग्णालयांमधील १६८ काेराेनाबाधित रुग्णांना प्राणवायू उपलब्ध असलेल्या ठिकाणी सुरक्षितपणे हलवण्यात आले. प्राणवायू पुरवठा सुरळीत राखण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. महापौर, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आयुक्तांसह संपूर्ण प्रशासनाचे सातत्याने परिस्थितीवर लक्ष होते.

---------------------

ताफ्यात ३५० रुग्णवाहिका नव्याने दाखल

मागील आठवड्यात रुग्णवाहिकांच्या ताफ्यामध्ये ३५० रुग्णवाहिका नव्याने दाखल झाल्या आहेत. त्यासोबत प्राणवायू पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी महानगरपालिकेकडून ६ समन्वय अधिकारी अन्न व औषध प्रशासन खात्याकडे नेमण्यात आले आहेत.

६ ऑक्सिजन पुरवठादार

मुंबईतील प्रत्येकी ४ विभागांमागे एक याप्रमाणे एकूण २४ प्रशासकीय विभागांसाठी ६ प्राणवायू पुरवठादार नियुक्त करण्यात आले आहेत, जे तातडीच्या स्थितीत प्राणवायू उपलब्ध करून देऊ शकतील.

* प्रशिक्षणाची कार्यवाही

मुंबईतील ६४ नर्सिंग होममध्ये प्राणवायूचा सुयोग्य व काटकसरीने उपयोग करण्याबाबत प्रशिक्षण देण्याची कार्यवाहीदेखील सुरू करण्यात आली आहे.

---------------------

रेमडेसिविरची खरेदी

रेमडेसिविर इंजेक्शनच्या २ लाख मात्रा खरेदी करण्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यातील २५ हजार मात्रा प्राप्त झाल्या आहेत.

---------------------

१०५० आयसीयू बेड्स नव्याने

मुंबईत एकूण १५३ कोविड रुग्णालये असून त्यामध्ये सध्या २० हजार ४०० बेडस् आहेत. आठवड्यात ही संख्या २२ हजार होईल. १० फेब्रुवारीपासून आजमितीपर्यंत १०५० आयसीयू बेड्स नव्याने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Web Title: Relief for Corona patients: Oxygen problem will go away by Monday afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.