अभिनेता अनिकेत विश्वासरावला दिलासा; उच्च न्यायालयाने गुन्हा केला रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 10:37 AM2023-11-17T10:37:26+5:302023-11-17T10:37:33+5:30
अनिकेतची पत्नी व मराठी अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने अनिकेत व त्याच्या आई-वडिलांविरोधात मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार पुणे पोलिसांकडे केली.
मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव व त्याचे आई-वडील यांच्यावर कौटुंबिक हिंसाचारांतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा उच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर रोजी रद्द केला. अनिकेत व त्याच्या आईवडिलांविरोधात अनिकेतची पत्नी व मराठी अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने मानसिक व शारीरिक छळाची तक्रार पोलिसांकडे केली होती.
अनिकेतची पत्नी व मराठी अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने अनिकेत व त्याच्या आई-वडिलांविरोधात मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार पुणे पोलिसांकडे केली. पोलिसांनी १६ नोव्हेंबर २०२१ रोजी अनिकेत व त्याच्या आईवडिलांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा रद्द करण्यासाठी अनिकेत व त्याच्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
न्या. नितीन सांब्रे व न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. अनिकेत व त्याच्या पत्नीमध्ये सामंजस्याने घटस्फोट झाल्याने व पोटगीची रक्कम जमा केल्यानंतर स्नेहाने अनिकेत व त्याच्या आई-वडिलांवरील गुन्हा रद्द करण्यास सहमती दिली व तसे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले.
अनिकेत व स्नेहाचा विवाह ५ ऑगस्ट २०१८ रोजी झाला. त्यानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले. अनिकेतचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा आरोपही स्नेहाने केला होता. करिअरमध्ये आपल्यापेक्षा आपल्या पत्नीचे नाव मोठे होईल, या भीतीने अनिकेतने जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच एकदा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्नही केला. लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देत असे आणि मारहाणही करत असे. त्याच्या या वागण्याला आवर घालण्याऐवजी त्याचे आईवडील त्याला दुजोरा देत असत, अशी तक्रार स्नेहाने पुण्यातील अलंकार पोलिस ठाण्यात नोव्हेंबर २०२१ मध्ये केली होती.
स्वेच्छेने गुन्हा रद्द
स्नेहाने स्वेच्छेने गुन्हा रद्द करण्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिल्यानंतर खंडपीठाने अनिकेतची याचिका मंजूर करत त्याच्यावरील व त्याच्या आईवडिलांवरील गुन्हा रद्द केला.